Breaking News

शरद पवारांनी जागवल्या गणपतराव देशमुखांच्या आठवणी म्हणाले… देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेत केले सांत्वन

सांगोला-सोलापूर : प्रतिनिधी

सतत ११ वेळा निवडूण येत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शोक प्रकट करत गणपतरावांसारखा स्वच्छ चारित्र्यसंपन्न नेता मिळणे हे महाराष्ट्राचे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली.

गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांगोला येथे जावून भेट घेत त्यांचे सांत्वन शरद पवार यांनी केले.

माझ्या घरातील सर्व सदस्य शेकाप विचारांचे होते. माझ्या घरी जी वर्दळ असायची ती सर्व शेकापच्या लोकांची असायची. गणपतराव यांचेही येणेजाणे होते. एक अत्यंत निर्मळ मनाचा माणूस, व्यक्तिगत कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांच्या प्रश्नांबद्दल अतिशय काळजी असणारे असे हे व्यक्तिमत्व असल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

गणपतरावांसारखा स्वच्छ चारित्र्यसंपन्न नेता मिळणे, हे महाराष्ट्राचे भाग्य. व्यक्तिगत सलोखा त्यांनी कधी सोडला नाही. लोकसभेसाठी या भागातून उभा होतो, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितले या भागात येण्याची गरज नाही, इथे माझी जबाबदारी आहे. त्यांनी मला इथून मोठा लीड मिळवून दिला होता. जेव्हा मंत्रिमंडळाची स्थापना झाली तेव्हा रोहयोची जबाबदारी आम्ही गणपरावांकडेच दिली. यासाठी आम्हाला त्यांची समजूत घालून मंत्रिपद द्यावे लागले होते. आज रोहयो योजना देशपातळीवर स्वीकारली गेली आहे. त्याचे सूत्र हे महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्ह्यात होते असे सांगत रोहयो योजनेचे खरे श्रेय गणपतराव देशमुख यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाणी या प्रश्नावर अखंड चिंता आणि चिंतन त्यांनी केले. मी १९६७ साली विधिमंडळात आलो, ते माझ्या पाच वर्षे आधी आले. माझ्या मंत्रिमंडळात ते शेती खात्याचे मंत्री होते. मला आठवतंय जेव्हा मंत्रिमंडळाची स्थापना करायची होती, तेव्हा गणपतरावांचे म्हणणे होते की मला मंत्रिपद देऊ नका. शेकाप पक्षाची ताकद रायगड जिल्ह्यात असल्यामुळे तेथील नेते दि. बा. पाटील यांना मंत्रिपद द्या, असा त्यांचा आग्रह होता अशी आठवणही त्यांनी करून दिली.

ग्रामीण भागातील नागरिकाला दोन वेळच्या अन्नासाठी झगडावे लागू नये, कष्टकऱ्यांचा कायदेशीर अधिकार हे सूत्र आपल्याला आणायचे आहे. त्यासाठी रोजगार हमी योजनेचे धोरण आपल्या सरकारने आणले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. गणपतराव देशमुख हे सांगोलापुरते मर्यादित नाहीत. महाराष्ट्रातील संबंध कष्टकरी, दुष्काळी भागातील जनतेचे ते नेते आहेत. खरंतर मला अंत्ययात्रेला यायचे होते. मात्र संसदेचे अधिवेशनामुळे मला येता आले नाही, याची खंत वाटते. त्यांच्यासारखा व्रतस्थ राजकारणी पुन्हा होणे नाही अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *