Breaking News

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या आतली बातमी उदय सामंत समर्थकांकडून बाहेर आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा ! खुर्च्या एक हजार गप्पा दहा हजाराच्या..!

उद्या शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे रत्नागिरीत येत आहेत. यापार्श्वभूमीवर उदय सामंत यांच्या समर्थकांकडून एक बातमीवजा आतली माहिती व्हायरल करण्यात येत आहे. सदरची बातमी खालील प्रमाणे…

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर चर्चा व नियोजन करण्यासाठी रत्नागिरीत एक बैठक नुकतीच पार पडली. सुरूवातीला या दौऱ्याचा खर्च कोणी करायचा यावर प्रश्न निर्माण झाल्याचे बैठकीला उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्यांने सांगितले. कारण गेली नऊ वर्ष कितीही मोठा संघटनेचा कार्यक्रम असला तर संघटनेच्या पदाधिकाऱ्याला एक ही रुपयाचा खर्च येतं नव्हता. हे देखील त्याच पदाधिकाऱ्याने सांगितले. कारण फक्त आणि फक्त उदय सामंत आणि किरण सामंत हेच सगळं नियोजन व आयोजन करायचे असेही या पदाधिकाऱ्यांने स्पष्ट केले.

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सभेचे ठिकाण ठरले ते म्हणजे साळवी स्टॉप. मंडप, खुर्च्या देखील ठरल्या. गर्दी दाखवायची असेल तर एक हजार खुर्च्या लावायचे ठरले. मात्र, प्रसिद्धी करण्यासाठी दहा हजारांची गर्दी असेल असे सांगायचे ठरले. या दौऱ्यासाठी माणसं आणायची कशी? त्यांच्या नाष्ट्याची व्यवस्था कोणी करायची? हे सगळे कसे होणार? आदी प्रश्न या बैठकीत काही जणांनी उपस्थित केले. शेवटी या मेळाव्याला राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार तालुक्यातून माणसे आणण्याचे ठरले. मात्र याचा

आर्थिक भार कोणी आणि कसा उचलायचा यावर या बैठकीत चर्चा झाली. प्रथमच नऊ वर्षांनी पहिल्यांदा सगळ्यांनी मिळून खिशात हात घालायचं ठरवलं. एक हजार खुर्च्या भरण्यासाठी किती खर्च येईल आणि कोणी किती खर्च करायचा हे देखील ठरले. बहुसंख्य लोक इच्छा नसताना देखील कामाला लागले आहेत, कारण त्यांना उदय सामंत यांनी त्यांच्यासाठी काय केलेले आहे याची जाणीव आहे. मनाने सामंत यांच्याबरोबर आणि शरीराने ते फक्त खा. विनायक राऊत यांच्या सोबत आहेत, असे दाखवत आहेत असेही या बैठकीला उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्यांने सांगितले.

आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरीत दौरा होणार आहे. तो दौरा म्हणजे सामंतांचे शक्ती प्रदर्शन असणार आहे. तो मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी आत्ता पासूनच शिंदे गट तयारीला लागला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यात जेवढे वक्ते उदय सामंत यांच्यावर टीका करतील तेवढी सामंत यांचीच मत वाढणार आहेत. राजकीय विश्लेषक याचे कारण सांगतात की, नामदार उदय सामंत यांनी अजूनही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर एका शब्दानेही टीका केलेली नाही. एवढंच काय तर खा. राऊत हे त्यांच्या बद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलल्यानंतरही त्यांनी एक चकार वाईट शब्द राऊतांबद्दल काढला नाही. परवाच भास्कर जाधव यांनी टीका केली. त्यावेळी देखील त्याची दखल घेतली गेली नाही. उद्या होणा-या मेळाव्याबद्दल देखील हेच होणार आहे. एक हजार खुर्च्या लावून हजारो लोकांसमोर बोलण्याच्या आविर्भावात मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका होईल पण त्याचा फायदा त्यांनाच होईल, असेही एका पदाधिकाऱ्यांने नमूद केले.

शेवटी, एकंदरीतच पाहता उद्याच्या दौऱ्याची तयारी जय्यत झाली आहे. मात्र, ज्यांचा हा मेळावा होतोय त्यांच्यावर एक हजार खुर्च्या लावून दहा हजार लोक असल्याच्या गप्पा मारायची वेळ का आली? याचे देखील आत्मचिंतन होणे आवश्यक आहे असे स्थानिकांचे मत आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *