Breaking News

अद्वय हिरे म्हणाले, भाजपा नेत्यांच्या सततच्या आठवणीमुळे अखेर फोन बंद करावा लागला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजपा नेते अद्वय हिरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना शिवबंधन बांधलं. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे म्हणाले, भाजपाचे जे नेते इतक्या दिवस माझी आठवण काढत नव्हते, ते नेते मी उध्दव ठाकरे यांच्यासोबत जाणार असल्याचे समजताच सारखी आठवण काढायला लागले. त्यामुळे अखेर मला त्याच्या सततच्या आठवणीमुळे मला माझा फोन बंद करावा लागला असे सांगत भाजपावर उपरोधिक टीका केली.

यावेळी अद्वय हिरे यांनी भाजपासह शिंदे गटावर हल्लाबोल करताना म्हणाले, २००९ साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेची जागा निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपाबरोबर काम करत आहे. भाजपामध्ये गेल्यावर सर्वजण पक्ष सोडून गेले होते. देशात सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत मंत्र्याला लोकसभेत पाडून भाजपाचा उमेदवार निवडून आणला. सरपंच, जिल्हा परिषदमध्ये भाजपाची सत्ता आणली. पण, आता ५० गद्दार भाजपाच्या मांडीवर बसल्यापासून त्यांना आमची गरज राहिली नाही.

कोणत्याही व्यक्तीगत पदासाठी भाजपाकडे मागणी केली नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली, तेव्हा आंदोलन केलं. पण, भाजपा सरकारने शेतकऱ्याला मरू दिलं. त्यामुळे भाजपाचा त्याग केल्याचे स्पष्टीकरणही अद्वय हिरे यांनी यावेळी दिले.

कालपासून भाजपाला माझी अचानक आठवण आली. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन आले. त्यांना स्पष्टपणे म्हटलं की कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा राहण्यासाठी काम करु. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरेंना बसल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही अद्वय हिरे यांनी यावेळी व्यक्त केला.

“शिवसेना सोडून लोकं निघून जात असल्याचा गैरसमज आहे. गेलेल्या गद्दारांना जनता धडा शिकवणार आहे. मी बाहेर पडलोय, ४९ मतदासंघातील भाजपाचे नेते बाहेर पडण्यासाठी थांबले आहेत. तिथे त्यांची कुचंबना होत आहे. निवडणूका जाहीर झाल्यावर ४९ मतदारसंघातून हे लोक शिवसेनेत प्रवेश करतील,” असा दावा अद्वय हिरे यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *