Breaking News

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपानेच केले वॉक आऊट विश्वासमत ठराव जिंकत केला विजय साजरा

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार भाजपाकडून पाडण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे मुख्यमंत्री सोरेन हे आपल्या समर्थक आमदारांना घेवून एकदा सहलीवर गेले तर नुकतेच विश्वासमत दर्शक ठरावाच्या आदल्या दिवशी पंचतारांकित हॉटेलची टूर केली. अखेर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडत तो सोरेन यांनी जिंकत जे महाराष्ट्रात शक्य होवू शकलं नाही ते त्यांनी झारखंडमध्ये शक्य करून दाखविलं.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी धोक्यात आली होती. या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोरेन यांनी आज विधानसभेचे विषेश अधिवेशन बोलावले होते. अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव हेमंत सोरेन यांनी जिंकला आहे. सभागृहात पहिल्यांदा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. सरकारच्या बाजूने ४८ मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही. विरोधी पक्ष भाजपाने मतदानावर बहिष्कार टाकला.
झारखंडमधील सत्ताधारी यूपीए आघाडीचे सुमारे ३० आमदार रायपूरला गेले होते. सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रविवारी दुपारी रांचीला परतले. या आमदारांना ३० ऑगस्टपासून रायपूरजवळील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व आमदारांबरोबर काल रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्वास ठरावाबाबत चर्चाही केली होती.

भाजपाकडूनही रविवारी सायंकाळी आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आजच्या विशेष अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत आमदारांना अनेक सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच भाजपच्या सर्व आमदारांना अधिवेशनात सक्तीने सहभागी होण्याचे निर्देशही देण्यात आले होते. विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी सुद्धा भाजपाची रणनीती ठरविण्यासाठी आज सकाळी नऊच्या सुमारास बैठक घेतली होती. मात्र, एवढ्या प्रयत्नानंतरही भाजपाला ‘वॉक आऊट’ करावं लागल्याचं दिसून येत आहे.

हेमंत सोरेन सरकारला ४९ आमदारांचा पाठिंबा आहे. ८१ सदस्यांच्या सभागृहात सर्वात मोठा पक्ष असलेल्या जेएमएमकडे सध्या ३० आमदार आहेत, काँग्रेस १८ आणि आरजेडीकडे १, तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपाकडे २६ आमदार आहेत.
विश्वासदर्शक ठरावापूर्वी करण्यात आलेल्या सभागृहातील भाषणात सोरेन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मी प्रत्येकावर भाष्य करत बसलो तर, हे अधिवेशनही कमी पडेल असे ते म्हणाले. या राज्यातील जनता जागी झाली आहे. त्यामुळे आम्हाला धमकावून चालणार नाही. देशाचे पंतप्रधानच जर देशातील राज्यांसोबर भांडत असतील तर, देशाचा विकास कसा होणार, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
आम्ही लोक कपडे, रेशन, किराणा सामान खरेदी करत असल्याचं ऐकलं आहे. पण फक्त भाजपच आमदार खरेदी करत आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

शिवसेना उबाठा गटाने जाहिर केली १६ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी

लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीयस्तरावरील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात काँग्रेस पक्षाने आणि भाजपाने आघाडी घेतली आहे. काँग्रेसने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *