Breaking News

मराठवाड्याच्या विकासासाठी लवकरच सर्व जिल्हाधिकारी, विभागप्रमुखांची बैठक केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती

नांदेड : प्रतिनिधी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला अर्थ राज्यमंत्रिपद दिले आहे. मी मराठवाड्यातील लातूर येथील भूमिपुत्र असून औरंगाबाद येथे स्थायिक झालो आहे. येणार्‍या अर्थसंकल्पात मराठवाड्याला झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. ते जन आशीर्वाद यात्रेनिमित्त नांदेडात आले होते. यावेळी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आ.भिमराव केराम, डॉ.तुषार राठोड, आ.अतुल सावे, मनोज पांगरकर, गणेश हाके, बापू घडामोडे, डॉ.अजीत गोपछडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

या पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ.कराड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. ज्या नवीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, अशांनी आपल्या भागात जन आशीर्वाद यात्रा काढून केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांशी आम्ही संवाद साधत आहोत. शिवाय ज्या कोणाला योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. विविध संघटना, व्यापारी शिवाय अन्य सामान्य माणसांच्या तक्रारी आम्ही ऐकून घेत आहोत व त्याचे निराकारण करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. सोमवारपासून या जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली. ही यात्रा परळी येथील गोपीनाथ गडावरून निघाली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वार्थाने मागास असलेल्या मराठवाड्याच्या विकासासाठी मी लवकरच सर्व जिल्हाधिकारी व विभागप्रमुखांची बैठक घेणार आहे. या बैठकीत सर्व प्रश्‍नांची सोडवणूक अशी आपली इच्छा आहे. मराठवाड्यातील सिंचन, आरोग्य, शिक्षण दर्जेदार असले पाहिजे, अशी माझी भूमिका राहणार आहे. या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करताना सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठवाड्याला झुकते माप देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्र शासनाच्या सर्वच योजना कोणत्याही परिस्थिती तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. मी ज्या सामान्य नागरिकांना भेटतो आहे, त्यांच्याकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांसाठी राबवित असलेल्या योजनांचे कौतुकच करीत आहेत. नांदेड येथे जन आशीर्वाद यात्रेचे मोठे स्वागत झाले असून या यात्रेला हजारो नागरिक भेट देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.शेषराव मोरे यांचीही भेट घेतली. त्यांनी स्वतः लिहिले एक इंग्रजीचे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यासाठी माझ्याकडे दिले असल्याचेही यावेळी पत्रकारांना सांगितले. ही यात्रा ३०० कि.मी. जाणार आहे. या दरम्यान पाच लोकसभा मतदारसंघातील गावांना भेटी देणार असल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, प्रवीण पा. चिखलीकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, गंगाधर जोशी, लक्ष्मणराव ठक्करवाड, गंगाधर कावडे, दिलीप ठाकूर, व्यंकट भोकरे, डॉ.अजित गोपछडे, अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *