राज्य सरकारने मुंबईतील तीन दिवसीय विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करून दाखविल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. उद्यापासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनास सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ४ वाजता नागपूरातील राजभवनात राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे.
या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात तिन्ही पक्ष अर्थात भाजपा, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या जवळपास ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज संध्याकाळी पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्यात भाजपाचे १९, अजित पवार यांचे ८ ते १० आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जवळपास १२ आमदार शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मंत्री पदासाठी सहभागी होण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेचे अब्दुल सत्तार, डॉ तानाजी सावंत यांना अद्याप निरोप देण्यात आले नाहीत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिपदाच्या यादीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ यांनाही निरोप देण्यात आलेला नसल्याची माहिती पुढे येत आहे. तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांनाही मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत अद्याप लाल झेंडा दाखविण्यात आले आहे.
भाजपाच्या या आमदारांना मंत्रिमंडळातील विस्तारासाठी समावेशबद्दल निरोप
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, जय कुमार रावल, पंकजा मुंडे, पंकज भोयर, राधाकृष्ण विखे पाटील , मंगल प्रभात लोढ़ा, शिवेंद्र राजे भोंसले, मेघना बोर्डिकर, नीतेश राणे, माधुरी मिसाळ , गणेश नाईक , आशिष शेलार, संजय सावकारे आणि आकाश फूंडकर यांना निरोप देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून
संजय सिरसाठ, उदय सामंत, शंभुराजे देसाई , गुलाबराव पाटील , भरत गोगावले, संजय राठोड, आशीष जयस्वाल, प्रताप सरनाईक, योगेश क़दम प्रकाश आबिटकर यांना मंत्री पदासाठी निरोप देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून
अदिती तटकरे , नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, इंद्रनील नाईक यांना मंत्रिपदासाठी निरोप देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.