Breaking News

मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून शरद पवारांनी दिला नारायण राणेंचा दाखला चुकीच्या पध्दतीने व राजकीय हेतूने कारवाई, पण बाहेर आणण्यासाठी संघर्ष करत राहणार- शरद पवार

कुर्ला येथील जमिन खरेदीप्रकरणात तब्बल २० वर्षानंतर ईडीने कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. मलिक यांच्या अटकेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी भाष्य केले. मात्र नवाब मलिक यांच्या अटकेवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पध्दतीने व राजकिय हेतून कारवाई केली असून मलिक यांना बाहेर आणण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहणार असल्याचा इशारा ईडीसह केंद्र सरकारला दिला.

नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना यातना देण्याचा प्रयत्न जाणुनबुजुन केला जातोय. मात्र याविरोधात संघर्ष करणार असल्याची स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर असून तेथे पत्रकारांशी ते बोलत होते.

दरम्यान नवाब मलिक यांना मंत्रीमंडळातून काढा असा आग्रह भाजपा करतेय, परंतु त्यांना अटक झाली म्हणून का काढा ? असा उलट सवाल शरद पवार यांनी भाजपाला केला.

गेली २० वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. त्या सर्व काळात कधी असे चित्र दिसले नाही, मात्र आताच दिसले. एखादा मुस्लिम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार बोलायचे कारण नसताना हा आरोप केला जातोय असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मला याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक यापध्दतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्याची चिंता करण्याचे कारण नाही असे स्पष्ट करत ते पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रीमंडळातून काढा असं बोलताय. कबूल आहे त्यांना अटक झाली. परंतु सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नसल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. उद्या कदाचित त्याचा खुलासा करतील अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

एक न्याय नारायण राणे यांना लावता आणि दुसरा न्याय नवाब मलिक यांना लावता याचा अर्थ हे सगळं राजकीय हेतूने केलं जातेय असेही ते म्हणाले.

उद्या पंतप्रधान पुण्यात येत आहेत. काही कार्यक्रमानिमित्त येत असतील तर त्यांच्या दौऱ्याची चर्चा करण्याचे कारण नाही. मात्र मध्यंतरी पुणे मेट्रो दाखविण्यासाठी मला बोलावण्यात आले होते. त्यावेळी मी पुणे मेट्रोने प्रवास केला. मात्र मेट्रोचे काम अर्धवट असून अर्धवट कामाचा उद्घाटन सोहळा कशासाठी असा सवाल त्यांनी यावेळी केला.

राज्यात मी पी.सी.अलेक्झांडर सारखे कर्तृत्ववान राजपाल पाहिले आहेत. मात्र आताच्या राज्यपालांबद्दल जे काही ऐकायला येते. त्यांच्याबद्दल भाष्य न केलेलेच बरे असा उपरोधिक टोलाही त्यांनी राज्यपालांना लगावला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *