Breaking News

अजित दादांचा विरोधकांना टोला तर आमदार, पीए आणि चालकांसाठी दिली खुषखबर येड पांघरूण पेडगावला जायचं होतं' की त्यांचा 'अभ्यास कमी होता' म्हणून अर्थसंकल्पावर टिका

इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लगावला.

अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी ‘सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाची बरे’, या संत तुकारामांच्या अभंगाने सुरुवात केली.

राज्य अडचणीतून पुढे जात असताना राज्याला कर्जातून बाहेर काढताना महसूली तुट कशी कमी करता येईल, नागरीकांवर कराचा भार पडता कामा नये व राज्याचा गाडा सुरळीत चालेल, विकासाला खीळ बसणार नाही असा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार आणण्याचा प्रयत्न करताय ठिक आहे, पण मला आश्चर्य वाटते फडणवीसांचे की, सर्वाधिक निधी राष्ट्रवादीला आणि त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसला दिल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. वास्तविक पाहता राज्याचे मुख्यमंत्री राहीलेल्यांनी तरी हा मुद्दा उपस्थित करायला नको होता असे सांगत ठराविकांना जास्त पैसे दिले असं बोलून काय होणार आहे का? असा टोलाही अजित पवार यांनी फडणवीस यांना लगावला. यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांचेही २१ पक्षांचे सरकार होते याची आठवणही त्यांनी यावेळी विरोधकांना करून दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांच्या निधीत वाढ करत असल्याची घोषणा केली करत यापूर्वी ४ कोटी इतका असलेला आमदार निधीत आणखी एका कोटींची वाढ करत हा निधी आता ५ कोटी रूपये इतका करण्यात आला असून आमदारांच्या चालकाला २० हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला ३० हजार रुपये देणार असल्याची घोषणा करत त्यांच्या वेतनात वाढ केल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देतानाच शेतकऱ्यांच्या बाजुने महाविकास आघाडी सरकार नाही या आरोपांचे खंडन करताना शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची आकडेवारी सभागृहात मांडली.

Check Also

संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय एकांगी त्यांनी…

शनिवारी प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरात काँग्रेसचे लोकसभा उमेदवार शाहु महाराज यांना बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *