Breaking News

या कारणाखाली आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि पराग मनेरे निलंबित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वाक्षरीनंतर राज्य सरकारकडून निलंबनाचे आदेश जारी

मराठी ई-बातम्या टीम
राज्याच्या राजकिय इतिहासात एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट आपल्याच विभागाच्या मंत्र्यावर आरोप करून खळबळ उडवून देण्याची पहिलीच घटना राज्यात घडली. मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी असताना परमबीर सिंग यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची वसूली करण्याचे आदेश दिल्याचे आरोप करत राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली. मात्र आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांच्या विरोधातच मुंबईसह इतर ठिकाणी विविध गुन्हे दाखल करण्यात आल्याने अखेर परमबीर सिंग आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी पराग मणेरे या दोघांना निलंबित करण्यात आले. परमबीर यांच्या निलंबना संदर्भातील फाईलवर मुख्यमंत्र्यांनी आज स्वाक्षरी केली. त्यानंतर गृह विभागाने या दोघांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश आज जारी केले.
परमबीर सिंग यांच्या विरोधात खंडणी, अॅट्रोसिटीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं आदेशात नमूद आहे. गृहविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय एका खात्याचे प्रमुख असूनही ते वेळेत सेवेत रुजू झाले नाहीत, असा ठपकाही ठेवण्यात आला.
परमवीर सिंग यांना मध्यंतरी फरार म्हणून घोषित करण्यात आले होते, तब्बल सात महिने त्यांचा ठावठिकाणा राज्य सरकारला लागलेला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते मुंबईत परतले. त्यानंतर परमबीर सिंग यांनी ठाणे गुन्हे शाखेसमोर हजर होत त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासकामी सहकार्य करण्यास सुरुवात केली. तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगासमोरही त्यांनी साक्षीसाठी हजर झाले. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची तब्बल एका तासासाठी भेट झाली होती. यासंदर्भात बोलताना या भेटीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
परमबीर सिंग यांच्यावर राज्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात मुंबईत मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशन, ठाणे जिल्ह्यात कल्याण, कोपरी आणि नगर पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. कामात अनियमितता, कर्तव्यात कसूर आणि सेवा नियमांचे उल्लंघन असा ठपका चौकशी समितीने परमबीर सिंग यांचेवर ठेवला आहे.
राज्याच्या गृहविभागाने परमबीर यांच्या सोबत अपर पोलीस अधीक्षक, उत्पादन शुल्क नागपूर पराग श्याम मणेरे यांनाही निलंबित केले आहे. मणेरी यांच्यावर ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद आहे. परमबीर सिंग हे ठाण्यामध्ये आयुक्त असताना मणेरे हे उपायुक्त होते.
इतके दिवस परमबीर सिंग यांच्यावर राज्य सरकार का कारवाई करत नाही याची चर्चा संबध राज्यभरात सुरु होती. मात्र आज अखेर परमबीर सिंग यांच्यावर राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून आणखी त्यांच्यावर काय काय कारवाई राज्य सरकार करणार याबाबत औस्तुक्य निर्माण झाले.

परमबीर सिंग आणि मणेरे यांच्या निलंबनाचे आदेशः-

 

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *