Breaking News

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ३०% टक्के जागेवर चार्जिंग बंधनकारक: इंधनापेक्षा स्वस्तच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

कोरोना काळापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षात चार्जिंग स्थानके उभी करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्याच्या एकात्मिक बांधकाम नियमानुसार सरकारी कार्यालये, मॉल, व्यापारी संकुले आणि गृहनिर्माण सोसयट्यांमधील एकूण जागेच्या ३० टक्के जागेवर चार्जिंगची सुविधा बंधनकारक करण्यात आले असून जुनी वाहने मोडीत काढण्याचे केंद्राचे धोरण लवकरच राज्यातही अंमलात आणण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

राज्य सरकार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (एमसीसीआयए) यांच्यातर्फे आयोजित पुणे पर्यायी इंधन परिषदेअंतर्गत (पुणे एएफसी) सिंचननगर मैदानावरील पर्यायी इंधनांवरील वाहन प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, एमपीसीबीचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर काही कंपन्यांच्या नव्या वाहनांचे सादरीकरण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याचे विद्युत वाहन धोरण, इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर, पर्यायी इंधनाची उपलब्धता आणि प्रदूषणमुक्तीमुळे अनेक उद्योग राज्यात येत असून, त्यामुळे रोजगार वाढतील. पर्यायी इंधनावरील सार्वजनिक वाहनांमुळे पुणे, मुंबईसारख्या महापालिकांच्या परिवहन मंडळांचा पेट्रोल-डिझेलवरील खर्च कमी होऊन, त्यांचा नफा वाढेल. तसेच इलेक्ट्रीक पर्यायी इंधनावर आधारित वाहन क्षेत्रातील नवउद्यमींच्या क्षमता वृद्धीवरही भर दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगचे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहेत. बॅटरी अदलाबदल, पर्यायी इंधन पुरवठा स्थानके आदी सुविधाही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महागाईबद्दल मी काही बोललो तर राजकीय अर्थ काढला जाईल. पण विद्युत वाहनांच्या चार्जिंगचा खर्च हा पेट्रोल-डिझेलच्या दराच्या तुलनेत अत्यंत कमी आहे असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

पुणे परिसरात पर्यायी इंधनावरील वाहनांचे उत्पादन करणारे, या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत आहेत. भविष्यात पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्त्व करेल आणि इतरांना पुण्याचे अनुकरण करावे लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आम्हाला मागील तोटा भरून काढायचाय सोलापूरातील सभेत बोलताना केली घोषणा

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होऊन ६० दिवस झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published.