Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेचा सवाल, याचा अर्थ काय? ट्विट करत केला सवाल

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत सध्या तरी अनधिकृतरित्या फूट पाडली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी बंडखोर आमदारांना परत बोलविण्याचे सातत्याने आवाहन करण्यात येत असतानाच मागील एक-दोन दिवसांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर टीकेची झोड उठविली. यावरून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याचा अर्थ काय असा थेट सवाल ट्विट करत विचारला. त्यामुळे बंड क्षमण्याची चिन्हे दूरावत चालल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकीकडे उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि मुख्य प्रवक्ते शिवसैनिकांना वाटेल त्या शब्दांमध्ये बोलून अपमान करत आहेत. तर दुसरीकडे याच शिवसैनिकांना समेटाची हाक दिली जात आहे, याचा काय अर्थ घ्यायचा?, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारलाय.

कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा असं उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सांगितलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे अशी भावनाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुखांच्या या भावनिक आवाहनाला शिंदे यांनी ट्विटरवरुन उत्तर देताना उद्धव ठाकरेंचे पुत्र म्हणजेच मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणजेच संजय राऊत हे बंडखोर आमदारांविरोधात वादग्रस्त भाषा वापरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनाच सवाल केलाय.

एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? असा प्रश्न शिंदे यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर विचारलाय. या ट्विटमध्ये शिंदे यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करु नका अशा अर्थाचा हॅशटॅगही वापरला आहे.

एकनाथ शिंदेंनी २१ जून रोजी बंड पुकारल्यापासून आतापर्यंत शिवसेनेचे ३९ आमदार त्यांच्या समर्थनार्थ गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. तर मागील काही दिवसांपासून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे कठोर शब्दांमध्ये या बंडखोर आमदारांना लक्ष्य करताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी या आमदारांचे मृतदेह परत येतील असं वादग्रस्त वक्तव्य करुन नंतर सारवा सारव केली. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेही शिवसैनिकांसोबतच्या मेळाव्यांमध्ये या आमदारांची तुलना नाल्यातील्या घाणीशी केली. याचमुळे शिंदे आणि बंडखोर आमदार दुखावल्याचं शिंदेंच्या ट्विटवरुन लक्षात येत आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *