Breaking News

पुणे-पिंपरी चिंचवडसह राज्यातील २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे-नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच राज्यातील ज्या महापालिकांनी या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप सुरु केली नाही त्यांना पत्र पाठवून यासंदर्भातील अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यसभा खासदार संजय राऊत, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक यांचेसह पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, श्री. संजय मोरे आणि पिंपरी चिंचवड शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी- चिंचवड या शहरातील विविध विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी या दोन्ही महापालिका आयुक्तांना दिले.

३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या नियमांची अंमलबजावणी अजूनही सुरु झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने, याबाबत शासनाने सर्व मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितले होते. त्यानुसार आलेल्या प्रस्तावावर नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करावी, तसेच कोणत्याही गुंठेवारीधारकास गुंठेवारी नियमित करण्याची इच्छा असल्यास त्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे. यानंतर पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून भरतीसाठी पदांच्या  आकृतिबंधाला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही  त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांना दिले.

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत योजना अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी या योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना दिले.तसेच ही योजना पूर्ण होईपर्यंत देखील शहरातील नागरिकांना एक दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला अभंगाचा नवा अर्थ, जो भंग होत नाही… देहू येथील संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकर्पण

संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published.