Breaking News

अजित पवारांचा टोला, काही नेते घोषणा करतात आणि घरात जावून बसतात अन्… मनसेप्रमुख राज ठाकरेंवर साधला निशाणा

मागील महिन्यापासून मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्षाची भूमिका स्विकारली. मात्र त्यांच्या आक्रमक भूमिकेचा सर्वाधिक फटका हिंदू धर्मियांच्या मंदिरांना आणि कार्यक्रमांना बसला. तरीही मनसे कडून मस्जिदींवरील भोंग्यावरून अद्यापही आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला असून काही जण घराबाहेर येतात, घोषणा करतात आणि परत घरात जावून बसतात अन् अधूनमधून गॅलरीत चकरा मारतात असा खोचक टोला लगावला.
आपल्याला महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू द्यायचा नाही. तसा कुणी प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक शासन केलं जाईल, अशा स्पष्ट शब्दांत अजित त्यांनी इशाराही मनसेला दिला.
आपल्याला सगळ्याच जाती-धर्माच्या धार्मिक स्थळांचा आदर आहे. तिथे गेले तर नतमस्तक होतो. त्यांच्या धर्मात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी ते करत असतात. ही आपली परंपरा आहे. त्यामुळे सध्या राज्यात हे जे काही सुरू आहे, ते थांबलं पाहिजे. ग्रामीण भागात जागरण गोंधळ, हरीनाम साप्ताह याची मला सर्वात जास्त काळजी आहे. कारण असे कार्यक्रम रात्री उशिरा आयोजित केले जातात. गावातील लोक मजुरी काम करून घरी परतल्यानंतर जेवण वगैरे करून अशा कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. पण भोंग्यांना विरोध केल्यामुळे अशा कार्यक्रमांवर देखील बंधणे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्हाला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. जर कुणी चुकीचं वागत असेल, तर तो कुठल्या पक्षाचा आहे, कुणाचा समर्थक आहे, हे आम्ही बघणार नाही. तो जर कायदा मोडत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. कुणी कितीही अल्टीमेटम दिली तरी आम्ही ऐकून घेणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील हे बाब लक्षात घ्यायला हवी. बोलणारे नेते घरी बसतात पण धरपकड अशा कार्यकर्त्यांची होते. नियम आणि अटींचं पालन करत जे लाऊडस्पिकरसाठी परवानगी घेतील, ते लाऊडस्पिकर लावू शकतात, असेही ते म्हणाले.
भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, संभाजी भिडे यांच्या बाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. काल पवार साहेब यांचीही चौकशी झाली. आयोग आपलं काम करत आहे. आयोग जोपर्यंत सर्व अभ्यास करून त्याचा अहवाल देत नाही, तोपर्यंत त्याबाबत आपण काही बोलणं कितपत उचित आहे, हे मला माहीत नाही. आयोगाकडे सगळे रिपोर्ट जात आहेत. बारकाईने तपास केल्यानंतर सर्वकाही पुढे येईल.
राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा संभाजी भिडेंना पाठींबा आहे. ते भिडेंच्या पाया पडतात का? याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचा कोणताही नेता संभाजी भिडेंच्या पाया पडणार नाही, किंवा त्यांना पाठीशी घालणार नाही. जर कोणता नेता अशाप्रकारे पाठिंबा देत असेल तर तो राष्ट्रवादीचा नसल्याचे सांगत या प्रश्नावर अजित पवार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *