Breaking News

नाना पटोलेंच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले, फार महत्व देण्याचे कारण नाही काँग्रेस श्रेष्ठींकडे केली पटोलेंनी तक्रार

विदर्भातील भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीला डावलून भाजपाशी हात मिळवित सत्ता हस्तगत केली. याप्रकरणावरून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप करत त्यासंदर्भातील तक्रार काँग्रेस श्रेष्ठींकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यानंतर यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, नाना पटोले यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. त्याला फार महत्त्व देण्याचं काही कारण नसल्याचे मत व्यक्त केलं. ते सोमवारी १६ मे रोजी कराडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाना पटोले यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्याला फार महत्त्व देण्याचं काही कारण नाही. आम्ही पण पक्षात काही झालं तर शरद पवारांना, मुख्यमंत्र्यांना सांगतो. हे चालत आलंय, ही परंपरा आहे. हे चालत असतं. आपल्या देशाने २४ पक्षांचं एनडीए सरकार बघितलं आहे. अनेक पक्षांचं यूपीए सरकार पाहिलं आहे. मागे १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडी सरकार बघितलं आहे. त्याहीवेळी भांड्याला भांडं लागतं होतं असे त्यांनी सांगितले.

एका कुटुंबात भांड्याला भांडं लागतं, तर तीन कुटुंबांमध्ये भांड्याला भांडं लागणारच ना. अशावेळी तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी भांड्याला भांडं लागू नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. नीटपणे सरकार चालवलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसेच याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवालही नाना पटोले यांनी केला होता.

महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मी सातत्याने संपर्क साधला. त्यांच्याशी भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले आणि ऐनवेळी भाजपासोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले होते.

दगाफटका खपवून घेणार नाही. आम्ही कधीही सत्तेसाठी लांगूनचालन केले नाही. परिणामांची चिंता करायला काँग्रेस सक्षम आहे. आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो. काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाची आणि विचारांची लढाई लढत आहे. आम्ही परिणामाची चिंता करत नसल्याचा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *