Breaking News

अजित पवार म्हणाले, तर राज्यात लगेचच निवडणूका घ्याव्या लागतील पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांची स्पष्टोक्ती

ओबीसी समाजाच्या राजकिय आरक्षणप्रश्नाची याचिका अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने सर्व माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारला पुरेसा वेळ मिळावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सर्व अधिकार शासनाने स्वत:कडे घेतले. त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही नुकतीच स्वाक्षरी केली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली प्रभागांची रचना, त्याची हद्द रद्द झाले आहे.

त्यामुळे मुंबई, पुण्यासह १४ महानगरपालिका आणि शेकडो जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणूका आता होणार नाहीत. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केली होती. निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या उद्देशानेच प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारने स्वत:कडे घेतले.

त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या बाबतीत सूचक वक्तव्य केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच निवडणुका घ्याव्या लागतील असे वक्तव्य केले.

निवडणुकांमध्ये ओबीसींनासुद्धा प्रतिनिधित्व मिळावे असा आमचा प्रयत्न आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती दिली, तर निवडणुका लगेच पण लागू शकतील. पुणे शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे व तीन सदस्यांचा प्रभाग राहणार आहे. यासर्वामध्ये आपण निवडणुकांच्या बाबत जागृत राहा. जनतेने चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे काम केले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रकारचा विकास करता येईल यासाठी आम्ही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील धनकवडी येथे माजी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांच्या संकल्पनेतून राजीव गांधीनगर परिसरात उभारलेल्या महापालिकेच्या स्व. माणिकचंद नारायणदास दुगड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लोकार्पण सोहळ्यात पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढले असून उत्तोत्तम आरोग्यासाठी सकस आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधातच गुणवत्तापूर्ण भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *