Breaking News

अजित पवारांकडून मलिक-नितेशला कानपिचक्या तर नारायण राणेंना टोला सिंधुदूर्ग दौऱ्यात काँग्रेस, शिवसेनेच्या मदतीला राष्ट्रवादी

मराठी ई-बातम्या टीम

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीसाठी सिंधुदूर्गात आलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या ट्विटर युध्दावरून कानपिचक्या देत त्या ट्विटरवरू कोंबड्याला मांजर करून किंवा कशाला काय म्हणून माझ्या कोकणातील विकासकामांचे प्रश्न सुटणार आहेत का? अशी टोचणी देत कोकणातील मतदारोनो विचारपूर्वक मतदान करा असे आवाहन करत संस्था उभ्या करायला अक्कल लागते. मात्र संस्था अडचणीत आणायला अक्कल लागत नाही असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच टोला लगावला.

विशेष म्हणजे अजित पवारांनी राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात जावून केल्याने अजित पवारांच्या या वक्तव्याला एक महत्व आले आहे. ते रत्नागिरीत प्रचारसभेत बोलत होते.

सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निर्धाराने मतदान करा. कुणाच्याही दबावाला, दादागिरीला, दहशतीला बळी पडण्याचं अजिबात कारण नाही. इथं कशाप्रकारे काही घटना घडल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आहे. म्हणून मतदारांनी गाफील राहू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

काही महाभागांनी कर्ज कसं मिळवलं, कसं थकवलं हे पाहा. कुणाच्याही दबावाला, दहशतीला बळी पडू नका. विचारपूर्वक मतदान करा. खासदार आमदार होणं सोपं, पण जिल्हा बँकेवर निवडून येणं अवघड आहे. कारण पार्टी तिथं कार्यकर्ता याप्रमाणे पक्षाचा कार्यकर्ता तिथं मजबुतीने काम करत असेल तर आमदारकी-खासदारकीत जमून जाते. इथं मात्र, वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढली, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर कृपा करून त्याला बळी पडू नका. आज आपल्या राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर याच बँका चांगल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

एकवेळी राज्यात सर्वाधिक पीक कर्ज देणारी बँक नाशिक जिल्हा बँक होती. आज ही बँक अडचणीत आली आहे. सोलापूरची बँकही दिग्गज नेते असून अडचणीत आली. उस्मानाबाद जिल्हा बँकही अडचणीत आली. वर्धा, नागपूर, बुलडाणा जिल्हा बँकाही अडचणीत आल्या आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, धुळे-नंदूरबार, वाशिम-अकोला, जळगाव, जालनाच्या बँका चांगलं काम करत असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी यावेळी देवून टाकले.

Check Also

भाजपा आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून धक्का आणि दिलासा २७ जानेवारी पर्यत अटक करता येणार नाही

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *