Breaking News

अजित पवार यांची ग्वाही, पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा

पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस उप महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलीसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिले आहेत. या निधीत पुरवणी मागण्यांद्वारे अधिक वाढ करण्यात येईल. पोलीसांसाठी ५३५ चौरस फुटांच्या साडेसहा हजार सदनिका शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही.
पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलीसांनी करू नये, असेही त्या़नी सांगितले.
गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. जिल्हा नियोजन मधून पोलीसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
शिर्डी विमानतळ विकासासाठी १५० कोटी
शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कार्गो टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील.
यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राज्यातील पोलीसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलीसांना पुढील दोन महिन्यांत ६ हजार ८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने राज्य पोलिस राखीव दलामधील पोलीसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचाही निर्णय घेतला.
कोरोना काळात पोलीसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले. गृह विभाग पोलीसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही. यासाठी काम करावे, असेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.
या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलीस व १ पुरूष पोलीस अंमलदारास सदनिकेच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, कार्यकारी अभियंता सुनिल‌ सांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, हिरालाल पाटील यांनी केले.

Check Also

भाजपा खासदार डॉ अनिल बोंडे, नवनीत राणा यांच्या लव्ह जिहादचा बार फुसका मुलीनेच दिला जबाब असा कोणताही प्रकार नाही

अमरावतीतील धारणी येथील एका हिंदू मुलीला मुस्लिम तरूणाने फुस लावून पळवून लावले. तसेच त्या मुलीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published.