Breaking News

उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांना टोला, हा जो पालापाचोळा आहे ते म्हणजे… ठाणेकर जनता सुज्ञ आहे ते निवडणूकीत दाखवून देतील

ठाणेकर हे सुज्ञ असून शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली त्या ठाण्यातच काय तर महाराष्ट्रभरातील लोक निवडणुकीचा वाटत पाहत असून निवडणुकीच्या निकालानंतर बंडखोरांचा हा पालापाचोळा उडून जाईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी लगावला आहे. इतकचं नाही तर त्यांनी राजकीय पक्षांनी युती करताना करार करुन तो जनतेसमोर ठेवायला हवा असा कायदा बनवण्याची मागणीही केली. याशिवाय त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर माईक खेचल्याच्या मुद्द्यावरुन माजी विरोधी पक्ष नेत्यांवर टीका करताना त्यांनी खेचलेल्या माईकवरुन केलेलं विधान हे शिवसेना संपवण्यासंदर्भातील डाव असल्याचा दावा केलाय. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली ताकद दिली. बाळासाहेब आणि ठाण्याचं एक भावनिक नातं होतं. पहिला भगवा झेंडा हा ठाण्यात फडकला. बाळासाहेब त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या कालखंडात सांगत राहिले की ठाण्याने मला पहिली सत्ता दिली. त्याच ठाण्यातून शिवसेनेला आव्हान उभं राहिलं, असं म्हणत राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ठाणेकर सुज्ञ आहेत. हा जो पालापाचोळा आहे ते म्हणजे ठाणेकर नाहीत. ठाणेकर आणि शिवसेनेचं ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे नातं पालापाचोळ्याला तोडता येणार नाही. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र निवडणुकांची वाट पाहत आहे असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

माझं मत हेच आहे यापुढे एक कायदा झाला पाहिजे. ज्यांना कोणाला युती करायची असेल त्यांनी करावी. मात्र त्यांच्यात काय करार झालाय तो जनतेसमोर ठेवा. जागावाटप किती होणार, कोणत्या ध्येय धोरणांवर युती करणार हे करारावर जाहीर करा. म्हणजे काय झालं असतं की माझं आणि भाजपाचं जे ठरलं होतं ते आधी नाकारुन त्यांनी आता केलं. हे जनतेसमोर उघडपणे आलं असतं. दुसरी गोष्ट निवडणुकीनंतर मला जे काय करावं लागलं ते टळलं असतं. महाविकास आघाडीचा जन्म नसता झाला. महाविकास आघाडीचा जन्म आम्ही दिला तेव्हा सुद्धा तुम्ही पाहिलं की मी शपथ शिवतिर्थावर घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आणि बाळासाहेबांच्या स्मारकाच्या साक्षीने शपथ घेतली. शिवतीर्थ पूर्ण फुलून गेलं होतं. लोक नाराज असती तर तिकडे कोणी आलं नसतं असेही ते म्हणाले.

माझं मत असं आहे की आता निवडणुका घ्या. जर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करुन चूक केली असेल तर लोक आम्हाला घरी बसवतील. नाहीतर आमच्याशी केलेला करार मोडणाऱ्या भाजपाला घरी बसवतील. ते घरी बसतील किंवा आम्ही पाप केलं असेल तर आम्हाला घरी बसवतील. होऊ द्या जनतेच्या न्यायालयामध्ये फैसला. माझी तयारी आहे. महाराष्ट्राची जनता मला ओळखते. आमची सहावी पिढी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या सगळ्या कालखंडात कधी नव्हे तो अघोरी प्रकार होतोय. जो महाराष्ट्रात कधीच झाला नव्हता. कोणीतरी संपूर्ण शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न करतोय, असा सवाल संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, कारण त्यांना पर्याय नाहीय, मी जे काय थोडंफार न्याय कायदेतज्ज्ञांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न केलाय, त्यातून सांगतो की आधी दोन तृतीयांश सदस्य संख्या झाल्यावर वेगळा गट स्थापन करता येऊ शकत होता. आता तो कायदा गेला. आता हे जे बाजूला झाले ते भलेही दोन तृतीयांश असतील तरी त्यांना वेगळा गट स्थापन करता येणार नाही हे कायदेतज्ज्ञ सांगतायत. मी कायदा लिहिलेला नाही. वाचलेला नाही. मी घटनातज्ज्ञांनी सांगितलेली मतं ऐकून, त्यांच्याशी बोलून सांगतोय असेही ते म्हणाले.

आता या साऱ्याचा अर्थ काय की या गटाला कुठल्या ना कुठल्या गटामध्ये विसर्जित किंवा सहभागी व्हावं लागेल. त्यांच्यासमोर पर्याय काय, एक तर भाजपामध्ये जावं लागेल. सपा आहे, एमआयएम वगैरे सारखे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्यात जावं लागेल. हे जर कोणत्या पक्षात गेले तर भाजपाला यांचा जो उपयोग करुन घ्यायचाय तो उपयोग संपेल. कारण त्यांची ओळख त्यांना तीच द्यावी लागेल की आम्ही अमुक एका पक्षात गेलो. म्हणून ते भ्रम निर्माण करतायत की आम्ही म्हणजेच शिवसेना असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसमोरील माईक खेचल्याच्या प्रकरणाचा संदर्भ देत शिवसैनिकांमध्ये भांडणं लावण्याचा भाजपाचा आणि फडणवीसांचा डाव असल्याचा दावा करत ते म्हणाले, मधल्या काळात एक क्लिप फिरली होती बघा. असं माझ्या बाबतीत कधी झालं नव्हतं. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे पण त्यांनी कधी माझा माईक नव्हता खेचला. काहीवेळा त्यांच्याकडे अधिक माहिती असायची अर्थसंकल्प वगैरे काहीबद्दल तर मी सांगायचो की तुम्ही उत्तर द्या. माझ्याकडून कोणी माईक नाही खेचला. आमच्या महाविकास आघाडीत एक सभ्यता होती आणि समन्वय होता असेही ते म्हणाले.

माईक खेचून त्यात जे उपमुख्यमंत्री बोलले की हे म्हणजे शिवसेना. त्यांचा डाव असाय की शिवसैनिकांमध्येच लढाई लावायची. शिवसेना संपवायची. एकदा का काम संपलं की पालापाचोळा टोपलीत भरला की नेऊन टाकायचा, असा टोलाही त्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला म्हणून आम्ही हिंदूत्व सोडलं असा आरोप केला जात आहे. मात्र सत्तेत असताना आम्ही राज्यातील गड किल्ले आणि प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचा निर्णय घेतला, तर काही ठिकाणी तिरूपतीच्या बालाजीला जागा दिली हे काय हिंदूत्व सोडणं झालं का? असा सवाल करत ते म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये त्या मेहबूबा मुफ्ती आजही वंदे मातरम् म्हणत नाहीत. पण तुम्ही त्यांच्याशी युती करून निवडणूका लढलात आणि सत्तेतही बसलात. त्यानंतर तुम्ही पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे आभार मानले असा गंभीर आरोप करत मग तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं हिंदूत्व असा सवालही त्यांनी भाजपाला यावेळी केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *