Breaking News

आणि उध्दव ठाकरे यांनी सांगितली शस्त्रक्रियेनंतरची स्वत:च्या तब्येतीची अवस्था… संपूर्ण शरीराची हालचाल थांबली होती

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर याआधीही शिवसेनेतील बंडाबाबतही चर्चा होतेय. तसेच शिवसेनेच्या स्थापनेनंतर अनेकदा शिवसेनेत बंडखोरी का होते असाही प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तसेच यावेळी शस्त्रक्रियेनंतर स्वत:ची काय परिस्थिती होती, शरीराची हालचाल होत होती की नाही यासह सर्व परिस्थिती त्यांनी यावेळी सांगितली. या मुलाखती दरम्यान उध्दव ठाकरे म्हणाले की, आम्ही पक्ष व्यावसायिक दृष्टीकोनातून चालवत नाही. बाळासाहेब ठाकरे, माँ यांनी आम्हाला पक्षातील नेत्यांना कुटुंब म्हणून पाहायला शिकवलं. एकदा आपलं म्हटलं की आपलं. त्यामुळे एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही अंधविश्वास टाकतो, ताकद देतो आणि राजकारणातील ती चूक आमच्याकडून वारंवार होते.

आम्ही हिंदुत्व सोडलं अशी बोंब जे मारत आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचं आहे की २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होतं? आजही शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. तेव्हा शिवसेनेला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं. तेव्हा अनेकांना वाटलं शिवसेना आता संपेल. मात्र, शिवेसना एकाकी लढली आणि ६३ आमदार निवडून आणले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रियेत काय धोके असतात हे कोणताही डॉक्टर सांगू शकेल. त्याची कल्पना मलाही होती. मात्र, ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी त्यातून व्यवस्थित बाहेर पडलो. पाच-सहा दिवसांनी सकाळी जाग आल्यावर आळस देण्याचा प्रयत्न केला आणि अचानक मानेत वेदना जाणवल्या. त्यानंतर माझी मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती असेही ते म्हणाले.

मला तेव्हा श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं. मी पूर्णपणे निश्चल झालो होतो. मानेत एक रक्ताची गुठळी तयार झाली होती. सुदैवाने डॉक्टर जागेवर होते. त्यामुळे ‘गोल्डन आवर’मध्ये (Golden hour) ती शस्त्रक्रिया झाली. म्हणून मी तुमच्यासमोर आज उभा आहे. त्या काळात काही गोष्टींची माहिती माझ्या कानावर येत होती, अशी माहितीही त्यांनी दिली.

माझे हातपाय हालत नव्हते, बोटं हलत नव्हती. त्यावेळी काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवासमोर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले आज पक्ष बुडवायला निघाले आहेत. तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं. तसेच तुझं काय होणार असं बोललं जात होतं असेही ते म्हणाले.

पक्षप्रमुखाची शस्त्रक्रिया झाल्यावर यांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन. मी त्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, मी रुग्णालयात असताना त्यांनी विश्वासघात केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *