Breaking News

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंनी मानले सर्वांचे आभार…तर माफी मागतो बाकीचे विषय नंतरच्या कॅबिनेटमध्ये

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडाळी माजली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही मविआ सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. यापार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानत जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला असेल किंवा कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी त्यांची माफी मागतो असे भावनात्मक उद्गार काढत अप्रत्यक्ष राज्य मंत्रिमंडळाचा निरोप घेतल्याचे स्पष्ट झाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला ४८ तासात बहुमत सिध्द करण्याचे आदेश आज दिले. त्यानंतर शिवसेना आणि राज्य सरकारकडून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत राज्यपाल कोश्यारी यांनी दिलेले आदेश बेकायदेशीर असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर शिवसेनेकडून अभिषेक मनु सिंगवी, तर एकनाथ शिंदे यांचे वकील कौल यांनी बाजू मांडली. त्यावर सुनावणी सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली. मंत्रिमंडळाची बैठक होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे अपेक्षित होते. मात्र बैठक संपली पण सर्वोच्च न्यायालयातील युक्तीवाद संपला नाही. तसेच न्यायालयाचा निकाल हाती आला नाही.

त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या अजेंड्यावर असलेल्या विषयांना मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचे आभार मानले. तसेच आपल्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल किंवा न कळत अपमान झाला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो असेही ते म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच उर्वरित राहिलेले विषयांवर पुढील कॅबिनेट बैठकीत निर्णय घेवू असे सांगितले. मात्र ती कॅबिनेट कधी होईल याबाबत ते काही बोलले नाहीत किंवा ही शेवटची बैठक आहे असेही काही बोलले नाहीत. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच त्यानुसार उद्या अविश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाणार असल्याचेही सांगितले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *