Breaking News

विजय वडेट्टीवारांची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी केली मोठी घोषणा आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना चार लाखांपर्यंत मदत

मराठी ई-बातम्या टीम

मागील अनेक वर्षांपासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विचार यापुढे एसडीआरएफ खाली करण्यात येणार असून एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत असल्याचे सांगत ही रक्कम चार लाख रूपयांपर्यंत वाढविण्याचा विचार असल्याची घोषणा मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री वडेट्टीवार यांनी वरील घोषणा केली.

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होत आहेत त्या थांबविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांना देण्यात येणारी मदत कमी असल्याचे मान्य करीत ही मदत चार लाखांपर्यंत वाढवता येईल का याचा विचार सुरू असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

जून ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान १०७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे आढळून आली त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने ४९१ प्रकरणे पात्र ठरविली असून एकूण २१३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले असून ३७२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत तर ४८२ प्रकरणी मदतीचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यपरिस्थितीत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या निकषानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना एक लाख रूपयाची रक्कम देण्यात येते. यापैकी ३० हजार रूपयांची रोख रक्कम शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तर ७० हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात ठेवीच्या स्वरूपात ठेवले जातात. आणि त्यावरील व्याज ५०० रूपये महिना शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना महिन्याला मिळते. मात्र ५०० रूपयांची रक्कम आता फारच अल्प असल्याने या एक लाख रूपयांच्या रकमेत वाढ करण्याचा गंभीर विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या रकमेत कशी वाढ करता येईल आणि शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना चार लाख रुपये मदत कशी देता येईल याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून धोरण ठरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *