Breaking News

विधान परिषदेत खडाजंगी: नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही मंत्री तुमच्या घरी हे सभागृह आहे.. उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना झापले !

विधान परिषदेत सभागृहात आज दुसऱ्या दिवशी एका तारांकित प्रश्‍नावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर उत्तर देत असतांना विरोधकांचे समाधान झाले नाही. या प्रश्‍नावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या वेळी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे खाली बसून बोलू लागले. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘मंत्री गुलाबराव पाटील हे दादागिरी करत बोलत असून त्यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर ५ मिनिटांसाठी सभागृह स्थगित झाले.

त्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना कडक शब्दांत सुनावलं. तुम्ही चौकात आहात का, छातीवर हात ठेऊन कसं बोलता, तुम्ही मंत्री तुमच्या घरी, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही. ‘संसदीय कार्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्याला समज द्यावी. गुलाबराव पाटील तुमचे वागणे चुकीचे आहे. तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला मी ताकीद देते’, असे उपसभापतींनी सांगितले.

विधान परिषद सभागृहात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना अनुदान संमत करण्यासंबंधी तारांकित प्रश्‍नावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, या विषयाची धारिका अर्थ खात्याकडे पाठवण्यात आली आहे, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेत ही धारिका आधीच मुख्यमंत्र्यांनी संमत केलेली असतांना आता ती धारिका पुन्हा अर्थ खात्याकडे का पाठवता ? ते सुपर मुख्यमंत्री आहेत का ?, असे सवाल करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी खाली बसून काहीतरी वक्तव्य केले. याला विरोधकांनी आक्षेप घेत ती भाषा दादागिरीची होती, असे सांगत माफी मागण्याची मागणी केली. या वेळी विरोधकांनी ‘दादागिरी नही चलेगी’, अशा घोषणा दिल्या. मोकळ्या जागेत येत घोषणा दिल्या.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, एका विषयावर एक मंत्री उत्तर देत असतांना गुलाबराव पाटील दादागिरीची भाषा कशी बोलतात ? त्यांच्या खात्याचा विषय नव्हता, तर त्यांनी शांत रहायला हवे होते. यानंतर उपसभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्य येऊन त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.
 

उपसभापती भडकल्या !
त्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मंत्री पाटील यांना दरडावतांना म्हणाल्या, ‘‘तुम्ही मंत्री आहात. तुमच्या वागण्याची पद्धत बदलली आहे. माझ्याकडे बघून हातवारे करत कसे बोलता ? तुम्ही खाली बसा. हे सभागृह आहे. सभागृहाची शिस्त आहे. तुमच्या खात्याचा संबंध नसतांना तुम्ही बोललाच कसे ? छातीवर हात मारून काय बोलता ? तुम्हाला ताकीद देते आणि संसदीय कार्य मंत्र्यांनीही मंत्री पाटील यांना समज द्यावी’’, असे गोऱ्हे यांनी सुनावलं. या वेळी नीलम गोर्‍हे चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. ‘मी मंत्री असल्याने बोलणारच’, असे गुलाबराव पाटील म्हणाले. त्यानंतर उपसभापती गोर्‍हे यांनी पाटील यांना फटकारले. तुम्ही मंत्री तुमच्या घरी आदी खाली बसा अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांना चांगलेच झापले. या वेळी सभागृहात स्मशान शांतता पसरली होती. यानंतर सुरेश धस यांनी उपसभापतींच्या तोंडी आलेले काही आक्षेपार्ह शब्द आहेत ते काढून टाकण्यात यावेत अशी मागणी केली त्यावर तपासून पाहण्यात येईल असे उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *