Breaking News

उद्धव ठाकरे यांचा गंभीर इशारा,… ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब न्यायालयाच्या निकालानंतर मोदी सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात केजरीवाल मातोश्रीवर

दिल्ली प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार कोणाकडे यावरून तीन वर्षाहून अधिक काळ सुरु राहिलेल्या न्यायालयीन लढाईत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा विजय झाला. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही दिल्लीतील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार स्वतःकडेच रहावेत या साठी मोदी सरकारने नव्याने अध्यादेश काढत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अप्रत्यक्ष रद्दबादल ठरविला. मोदी सरकारच्या या अध्यादेशाच्या विरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी सर्व प्रमुख नेत्यांमध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीवर सविस्तर चर्चा झाली. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान शरद पवारांचीही भेट घेण्यासाठी जाणार आहेत. या भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, येणार वर्ष निवडणूकीचं आहे. यावेळी जर ट्रेन सुटली तर आपल्या देशातून लोकशाही गायब होईल अशी गंभीर शक्यता व्यक्त केली.

आपचे प्रमुख नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोक फक्त

राजकारण करतात. आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जपत असतो. राजकारण आपल्या जागी असतं. येणारं वर्ष निवडणुकीचं आहे. यावेळी जर ट्रेन सुटली, तर आपल्या देशातून लोकशाही गायब होईल. लोकशाहीला वाचवण्यासाठी देशातून जे लोकशाही हटवू इच्छितात, त्यांनाच मी विरोधी पक्ष म्हणेन, अशी विरोधक म्हणून नवी व्याख्याही ठाकरे यांनी जाहिर केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने दोन निकाल दिले आहेत. एक शिवसेनेच्या बाबतीत आणि दुसरा दिल्लीच्या बाबतीत. लोकशाहीत लोकप्रतिनिधींचं सर्वात जास्त महत्त्व असतं. दिल्ली सरकार आणि ‘आप’च्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण त्याविरोधात केंद्र सरकारने अध्यादेश काढला. आता असे दिवस येतील की राज्यांमध्ये निवडणुका होणारच नाहीत. फक्त केंद्रात निवडणुका होतील. त्यातही २०२४ च्या निवडणुकांमध्ये जनता काय निर्णय देते, त्यावर बरंच काही अवलंबून असेल, अशा शब्दांत चिंता व्यक्त केली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच विरोधी पक्षांकडून तशी अपेक्षाही बोलून दाखवली जात आहे. मात्र, विरोधी पक्षांमध्ये एकमत करण्याचे याआधीचे प्रयत्न फसल्यामुळे यावेळी तरी विरोधकांना यश येईल का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली होती. त्याआधी ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीला आल्या होत्या. आता अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या भेटीमुळे विरोधकांच्या एकजूटतेसाठी प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *