Breaking News

शिंदे-फडणवीसांच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख करणार विधिमंडळात उपोषण ठाकरे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्याचे गलिच्छ राजकारण

सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून या अधिवेशात ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांवर घालण्यात स्थगिती उठविण्याचे आमिष दाखविण्यात येत असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु आहे. मात्र ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी या चर्चेच्या अनुषंगाने मोठे विधान केल्याने भाजपा आणि शिंदे गटाकडून वापरण्यात येत असलेल्या दबावतंत्र उघडकीस येत असून या विरोधात आपण विधिमंडळ परिसरातील छत्रपतती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.

यावेळी अकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन देशमुख म्हणाले, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्याचे गलिच्छ राजकारण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सुरू आहे, ६९ गावे पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी उपोषण करणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी नितीन देशमुख यांनी फडणवीसांवर आरोप करताना म्हणाले, ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली. योजनेला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा होणार असून, याला काही ग्रामस्थांनी विरोध केला. ६० गावे पाणी पुरवठा योजनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारने स्थगिती दिली. योजनेची किंमत २१९ कोटी रुपये असून, प्रत्यक्ष योजनेवर १९२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यापैकी १०८ कोटी रुपये खर्च झाले असून, कंत्राटदाराला ९२ कोटीचे देयकही अदा करण्यात आले आहे. योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले असतांनाही त्याला स्थगिती देण्यात आल्याचा दावा केला.

वानमधून शेगाव, जळगाव जामोद येथेही पाणी पुरवठा होतो. मात्र, त्या ठिकाणी भाजपाचे आमदार असून, बाळापूर येथे मात्र शिवसेनेचा आमदार असल्यानेच भाजपा विरोध करीत आहे. तत्कालीन ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेलाच स्थगिती देत ग्रामस्थांना तहानलेले ठेवण्यात येत आहे, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला. या विरोधात मंगळवारी विधिमंडळ परिसरात आंदोलन करणार आहे. अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच हजार ग्रामस्थ देखील आंदोलन करतील, असे ते म्हणाले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *