Breaking News

नाना पटोले यांचा इशारा, पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी लढा देणार

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्य़ाचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशिर्वादाने विमा कंपन्याकडून शेतक-यांची खुले आम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

शेगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून प्रवास करत असताना हजारोंच्या संख्येने शेतकरी राहुलजींना भेटले, अतिवृष्टी, पुरामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले तसेच पीक विमा कंपन्यांकडून अद्याप मदत मिळाली नसल्याहीचे सांगितले. त्यांनी मांडलेली व्यथा पाहून या शेतक-यांच्या मदतीसाठी लढा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पीक विमा मदत कक्ष स्थापेन करण्यात येणार आहे. ज्या शेतक-यांनी पीक विमा भरला आहे पण त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक व पीकविमा भरल्याची पावती (झेरॉक्स) ही कागदपत्रे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पीकविमा कक्षात जमा करून घेण्यात येणार आहेत. राज्यातील शेतक-यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष पाठपुरावा करून लढाई लढेल.

पीक विमा कंपन्या सरकारी आशिर्वादाने प्रचंड नफेखोरी करत आहेत. शेतक-यांना मदत करण्याऐवजी विमा कंपन्याकडून गरीब शेतक-यांची लूट सुरु आहे. त्यांची ही मनमानी आता खपवून घेतली जाणार नाही. या कंपन्यांविरोधात काँग्रेस पक्ष आता मैदानात उतरणार असून कंपन्यांनी शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिली नाही तर त्या विमा कंपन्यांना महाराष्ट्रात काम करु दिले जाणार नाही असा स्पष्ट इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.

कोश्यारींची राज्यपालपदाची पात्रता नाही

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांचा आणि समाजसुधारकांचा अपमान करत आहेत. महापुरुषांचा अवमान करणे हाच भाजपचा अजेंडा आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्यांचा निषेध करण्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची पाठराखण करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. फडणवीसांना आता शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून आणि खोटी माहिती पसरवून महाराजांचा अपमान करून भाजप नेते आणि विविध पदांवर त्यांनी बसवलेले संघाचे बाहुले आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करत आहेत. महाराष्ट्रातील जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *