Breaking News

अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावाः नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात राज्यपाल यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रक्रिया कळवण्यात आली होती. राज्यपाल पदाचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी सरकारने घेतली होती. अध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात पार पाडता आली असती. परंतु शेवटच्या दिवशी सकाळी राज्यपालांनी पुन्हा पत्र पाठविले. कायद्याचा पेच निर्माण होऊ नये म्हणून मविआ सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात घेणे टाळले. ही निवडणूक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी विरोधी पक्षाकडून दिली जात आहे परंतु विरोधी पक्षांनी भ्रमात राहू नये. मविआ सरकार अशा धमक्यांना घाबरत नसल्याचेही ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने राज्यपालांच्या माध्यमातून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळा आणला. कोरोनामुळे आतापर्यंत झालेली अधिवेशने कमी कालावधीची झाली होती. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणुक घेता आली नाही. यावेळी ती प्रक्रिया पूर्ण करता आली असती पण त्यात भाजपानेच अडथळा आणला. भाजपाची दुतोंडी भूमिका उघडी पडली आहे. सरकारकडे १७४ चे बहुमत आहे. त्यामुळे आवाजी मतदानावरून विरोधकांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी काँग्रेसकडून अधिवेशाच्या सुरुवातीपासूनच आग्रही भूमिका मांडण्यात येत होती. तसेच काहीही झाले तरी या हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घ्यायचीच यावर काँग्रेस ठाम होती. तसेच विधान परिषदेच्या निवडणूकीत झालेल्या मतफुटी प्रकरणाची पृनःरावृत्ती होवू नये म्हणून अध्यक्ष निवडणूकीत मतदान करण्याच्या नियमातही दुरूस्ती करण्यात आली. परंतु राज्यपालांनी करण्यात आलेली दुरूस्तीच घटनाबाह्य असल्याचे उत्तर राज्यपालांनी पाठविल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले. त्या पार्श्वभूमीवर निवडणूकीची प्रक्रिया जाहिर न करता ती थांबविण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य महत्वाचे आहे.

Check Also

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, “आभासी उपस्थिती असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच” निर्भया पथकाच्या धून उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे विरोधकांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची दुसऱ्याकडे द्या असा खोचल सल्ला विरोधकांकडून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *