Breaking News

विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा स्टार प्रवाह वाहिनीला आणि भाजपाला दिला इशारा

मराठी ई-बातम्या टीम

अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का? असा संतप्त सवाल विचारत, महाराष्ट्र हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, अभिनेते किरण माने यांच्याबाबतीत जो प्रकार घडला तो बंद झाला पाहिजे. महाराष्ट्रात असली दडपशाही चालू दिली जाणार नाही. संविधानाच्या चौकटीत आपले मत व्यक्त करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. एखादी विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जात असेल तर काँग्रेस पक्ष तो कधीही खपवून घेणार नाही. काँग्रेस पक्ष किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

पुरोगामी महाराष्ट्राला एक समृद्ध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहे. यापूर्वीही विविध कलाकारांनी राजकीय वक्तव्ये केली, सरकारविरोधात भूमिका घेतली पण म्हणून काही त्यांना चित्रपट किंवा मालिकेतून काढले नाही. किरण माने यांनी व्यक्त केलेल्या मतांशी तुम्ही सहमत नाही म्हणजे त्यांच्या पोटावर पाय देणार का? आरएसएस विचाराची ही दडपशाही महाराष्ट्रात चालणार नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशा विभाजनवादी विचारांना थारा नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला

भाजपा सरकारविरोधात समाज माध्यमावर मत व्यक्त केले म्हणून ‘स्टार प्रवाह’ या खाजगी वाहिनीने किरण माने या कलाकाराला ‘मुलगी झाली हो’, या मालिकेतून काढण्यात आले हे अत्यंत निषेधार्ह असून ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीने केलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

अभिनेते किरण माने हे सातत्याने सामाजिक आणि राजकिय प्रश्नावर नेहमीच आपली भूमिका सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीरपणे मांडत आहेत. मात्र यावेळी त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडल्याने त्यांना थेट मालिकेतूनच बाहेरचा रस्ता दाखविल्याने त्यांचे पडसाद राजकिय वर्तुळात उमटले आहेत. तसेच ट्विटरवर स्टॅड विथ किरण माने हा ट्रेंडही चालविला जात आहे.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *