Breaking News

देशाच्या संपत्तीचे मालक नागरिक: लुटणाऱ्यांविरोधात काँग्रेस करणार संघर्ष केंद्रातील जुलमी, अत्याचारी भाजपा सरकारविरोधात पेटून उठा!: नाना पटोले

सातारा-मुंबई: प्रतिनिधी

केंद्रातील भाजपा सरकार आपली राष्ट्रीय संपत्ती दोन चार उद्योगपती मित्रांच्या घशात घालत आहे. देशातील रस्ते, रेल्वे स्टेशन, रेल्वेमार्ग, ऊर्जा विभाग, गॅस पाईपलाईन, टेलिकॉम सेक्टर, गोडावून, खाणी, विमानतळे, बंदरे अशी पायाभूत क्षेत्रे उद्योगपतींना ६ लाख कोटी रुपयांसाठी ४० वर्ष लीजवर दिली आहेत. देशाची संपत्ती खाजगी लोकांना विकण्याचा सपाटाच लावला आहे. याला काँग्रेसचा विरोध असून देशाची संपत्ती लुटणाऱ्यांविरोधात उभे राहून देशाची संपत्ती विकू देणार नाही. देशाच्या संपत्तीचे मालक नागरिक आहेत, या संपत्तीचे जतन करु आणि देशाची संपत्ती लुटारुंपासून वाचवण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सुरु असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान आज सातारा जिल्ह्यातील वडूज येथे संपन्न झाले. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते अतिल लोंढे, माजी आमदार उल्हासदादा पवार, व्यर्थ न हो बलिदान अभियानाचे समन्वयक व प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस आबा दळवी, ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, आ. विक्रम सावंत, बाळासाहेब कदम, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश सचिव रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वांतत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला जगात ताठ मानेने उभे केले, विकासाच्या विविध योजना राबवून देशात क्रांती घडवून आणली त्या पंडित नेहरुंचा विसर केंद्रातील भारतीय जनता पक्षाला पडला आहे. केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेताना पंडित नेहरुंचा फोटो टाकण्याचे सौजन्यही न दाखवता त्यांना वगळून देशाच्या स्वातंत्र्याप्राप्तीसाठी लढलेल्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. ७४ वर्षात देश उभा राहिला तो देश ७ वर्षात विकला जात आहे. ब्रिटीश राजवटीसारखेच केंद्रातील सध्याचे सरकार जुलमी अन्यायी, अत्याचारी, सरकार असून त्याविरोधात पेटून उठले पाहिजे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. 

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या ६० वर्षानिमित्त प्रदेश काँग्रेस लवकरच महाराष्ट्राच्या निर्मितीत काँग्रेस पक्षाचे योगदान हा कार्यक्रम घेऊन येणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतच्या सरकारचे राज्याच्या जडणघडणीतील योगदान यातून जनतेसमोर आणले जाणार आहे. जनतेने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बोलताना विधीमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सातारा, वडूजची ही भूमी क्रांतीची भूमी आहे, साताऱ्याची भूमी देशातील क्रांतीकारकांची केंद्रबिंदू होती, या भूमीने देशाला ऊर्जा दिली आहे. १८५७ च्या उठावावेळीच या भूमीत स्वराज्याची मशाल पेटली होती. या भूमीतून क्रांतीकारक जन्माला आले. सरकार कसे असावे हे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी दाखवून दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाला संविधान देऊन सामान्य लोकांना ताकद दिली, पण आता संविधान अबाधित राहिल का ?, लोकशाही अबाधित राहिल का ? याची शंका वाटते. २०१४ पासून देशातील चित्र बदलले आहे. दहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे, त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले, गोळीबार केला, शेतकरी रक्तबंबाळ झाले पण दिल्लीतील सरकार सुस्त पडून आहे, शेतकऱ्यांची दखल ते सरकार घेत नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांवर जुलुम करत असताना महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला. सत्तेसाठी काहीही करायचे हे भाजपाचे तंत्र आहे. परंतु हा देश राज्यघटनेच्या तत्वानुसारच चालेल. काँग्रेस पक्ष सध्या संकटात असला तरी केंद्रात पुन्हा सोनियाचेच दिवस येणार आहेत अशी ग्वाही दिली.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, साताऱ्याच्या भूमीतून क्रांतीसिंह नाना पाटील, स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासह शेकडो लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले. या स्वातंत्र्यचळवळीत वडूजच्या भूमीत ९ जणांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्या बलिदानाचा आपणास विसर पडू नये. आज देशातील चित्र बदललेले आहे, संविधान वाचवा असे म्हणायची वेळ आली आहे. केंद्रातील सरकार संविधान संपवण्याचे काम करत आहे. संस्थात्मक रचना ताब्यात घेऊन मनमानीपद्धतीने काम केले जात आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाही राहिलेली नसून हुकूमशाही व्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे असे चित्र जगात निर्माण झाले आहे. पॅगेसीसच्या माध्यमातून हेरगिरी करून सर्वांची माहिती घेतली जात आहे, हे कोण करतेय याची चौकशी सरकार करत नाही. रशियातील केजीबीचा एक अधिकारी नंतर देशाचा पंतप्रधान झाला, त्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाला आणि आता आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष बनून रशियात एकाधिकारशाही आणली आहे. भारताची वाटचालही रशियाच्या दिशेनेच सुरु आहे.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री सतेज बंटी पाटील, डॉ. विश्वजित कदम यांनीही आपल्या भाषणातून केंद्रातील भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला.

तत्पूर्वी सकाळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी वडूज येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले.

Check Also

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही तर… राजभवनावरील कार्यक्रमात बोलताना भविष्यकालीन योजनांचा सुतोवाच

पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले. राजभवन …

Leave a Reply

Your email address will not be published.