Breaking News

“मोदींना मारू शकतो आणि शिव्या देवू शकतो” व्हायरल व्हिडिओवर पटोलेंचा खुलासा ते वाक्य पंतप्रधान मोदींना उद्देशून नव्हे तर स्थानिक गांवगुंडाबाबतचे

मराठी ई-बातम्या टीम

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला असून त्या व्हिडिओत त्यांनी “मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसून येत असतानाच या वक्तव्याबाबत दस्तुर खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा खुलासा करत ते वक्तव्य नरेंद्र मोदींच्याबाबत नव्हते असे सांगत याप्रकरणावरून झालेल्या राजकारणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे, त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही असे स्पष्टीकरण त्यांनी ट्विटरद्वारे दिले आहे.

मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय, पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे….,” असे नाना पटोले या व्हायरल व्हिडीओमध्ये बोलत असताना दिसत आहेत.

दरम्यान या व्हायरल व्हिडिओवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठविली असून ते म्हणाले की, पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते खोचक टीका केली.

Check Also

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published.