Breaking News

पटोलेंचे आवाहन, भाजपामुक्त लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा निलंगा तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यातही हा ओघ असाच राहिल. लातूर जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश घेवून लातूर जिल्हा भाजपमुक्त करण्यास सुरुवात केली असून भाजपमुक्तीचा हा लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला यावेळी लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, आमदार राजेश राठोड, आमदार धिरज देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड किरण जाधव, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रदेश सरचिटणीस व लातूर जिल्हा प्रभारी जितेंद्र देहाडे, काँग्रेस नेते अभय साळुंके आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाने सत्तेत येताना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सत्तेत आल्यापासून भाजपाने संविधान संपवण्याचे काम सुरु केले आहे. तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पापही केले जात आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला जात आहे. भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून आज लातूरमधून भाजपमुक्तीची सुरुवात झाली असून आता हे वातावरण मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा. मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले पाहिजे यासाठी जोमाने काम करा, असे आवाहन करत त्यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी बोलताना लातूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, स्व. विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला लातूर जिल्ह्यात भक्कमपणे उभे केले. आज मोठ्या संख्येने भाजपासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्वजण तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यासाठी राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष करण्याकामी लातूर जिल्ह्याचा मोठा वाटा असेल असेही ते म्हणाले.
लातूर जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, चाकूर, तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विशेषतः निलंगा तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित तुकाराम माने, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष हमिद इब्राहिम शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चक्रधर शेळके, पंचायत समिती सदस्य रमेश सोनावणे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती विक्रम जाधव, निलंगा तालुका भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय सुधाकर सुभेदार, निलंगा येथील ज्येष्ठ भाजपा नेते आबासाहेब गोविंदराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलंगा विलास विनायक लोभे, अनुसुचित मोर्चा लातूरचे जिल्हाध्यक्ष अनिता सुधाकर रसाळ, निलंगा बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड सुनिल तुकाराम माने, निलंगा बार असोशिएशनचे सचिव प्रविण नरहरे, एमआयएम निलंगा अध्यक्ष मनजीब अब्दुल सौदागर, अनिल चव्हाण, उमाकांत प्रल्हाद सावंत, खुदबुद्दीन घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद मुळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *