Breaking News

प्रियंका गांधी-वड्रा यांनी सांगितला ३२ वर्षापूर्वीचा प्रसंग, म्हणाल्या, मग श्रीराम घराणेशाही मानणारे होते का? संकल्प सत्याग्रह आंदोलनावेळी राजीव गांधी यांच्या अंत्ययात्रेचा सांगितला प्रसंग

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने देशव्यापी संकल्प सत्याग्रह पुकारला आहे. या सत्याग्रह आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही काँग्रेसकडून नवी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. या वेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी बोलताना ३२ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आवर्जून सांगितला. गांधी परिवारावर टीका करणाऱ्या नेत्यांवरही प्रियंका गांधी यांनी टीका केली. या देशाच्या लोकशाहीसाठी माझ्या कुटुंबाने रक्त वाह्यलं आहे. त्यामुळे तुम्ही अशा कुटुंबाचा अपमान कसा काय करू शकता असा सवालही मोदी सरकारला विचारला.

यावेळी बोलताना प्रियंका गांधी-वड्रा म्हणाल्या, माझे वडील राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर १९९१ मध्ये माझ्या वडिलांच्या पार्थिवाची अंत्यायात्रा तीन मूर्ती भवन या ठिकाणाहून निघाली होती. त्यावेळी आई सोनिया गांधी, मी आणि राहुल आम्ही एका गाडीमध्ये बसलो होतो. आमच्यासमोर भारतीय लष्कराने एक ट्रक आणला होता जो फुलांनी सजवला होता. त्या ट्रकवर माझ्या वडिलांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. थोडंसं पुढे गेल्यानंतर राहुल म्हणाला मला खाली उतरायचं आहे. तेव्हा आईने नकार दिला. कारण सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. आई नाही म्हणाली तरीही राहुल गाडीमधून खाली उतरला आणि वडिलांच्या अंत्ययात्रेसोबत चालला. आत्ता आपण इथे उभे आहोत इथून साधारण थोडसंच दूर असलेल्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या पार्थिवावर राहुलने अंत्यसंस्कार केले.

तसेच या घटनेबद्दल सांगताना प्रियंका गांधी-वड्रा म्हणाल्या, राहुल गाडीमधून उतरून वडिलांच्या अंत्ययात्रेत गेला होता. मला आजही ते दृश्य आठवतं. माझ्या वडिलांचं पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आलं होतं. त्या अंत्ययात्रेच्या मागे मागे चालत राहुल राजघाटपर्यंत आला होता. देशासाठी शहीद झालेल्या माझ्या वडिलांचा अपमान संसदेत करण्यात येतो. एका शहीद वडिलांच्या मुलाला देशाच्या संसदेत देशद्रोही म्हटलं जातं, मीर जाफर म्हटलं जातं. एवढंच नाही त्या माझ्या आईचाही अपमान केला जातो. मोदी सरकारमध्ये बसलेले मंत्री माझी आई सोनिया गांधींचा अपमान करतात. एका मंत्र्याने तर असं वक्तव्य केलं होतं की राहुल गांधींना हेही ठाऊक नाही की त्यांचे वडील कोण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते की नेहरुंचा अभिमान वाटतो तर ते आडनाव का स्वीकारलं नाही? त्यावेळी पंतप्रधान मोदींवर तर कुठलाच खटला भरला गेला नाही, त्यांचं सदस्यत्वही रद्द झालं नाही, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी ३२ वर्षांपूर्वीचा प्रसंग सांगितला.

प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, भाजपाकडून सातत्याने आमच्या कुटुंबाचा अपमान केला जातो. संसदेत माझ्या भावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली होती आणि सांगितलं होतं की मी तुमचा तिरस्कार करत नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. पण आम्ही तिरस्कार पसरवणाऱ्या विचारधारेचे नाही असंही राहुलने सांगितलं होतं. काँग्रेसने आज संकल्प सत्याग्रह पुकारला आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, जर तुम्ही आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करत असाल तर मला सांगा भगवान श्रीराम कोण होते? त्यांना वनवासात धाडण्यात आलं. मात्र त्यांनी आपल्या कुटुंबाबतचं जे कर्तव्य होतं त्याचं पालन केलं. मग राम घराणेशाही मानणारे होते का? असा भावनिक सवालही प्रियंका गांधी-वड्रा यांनी यावेळी उपस्थित करण्यात आला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *