Breaking News

महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वोदयी हर्षवर्धन सपकाळः कोण आहेत सपकाळ तर विधानसभेच्या काँग्रेस गटनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्विकारून नाना पटोले यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरु झाली होती. तसेच नाना पटोले यांच्याऐवजी यापुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी नव्य़ा व्यक्तीची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आज अखेर बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीकडून आज जाहिर करण्यात आले.

हर्षवर्धन सपकाळ हे पहिल्यापासून गांधी घराण्याचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पहिल्या भारत जोडो अभियानाच्यावेळी मराठवाड्यातून आणि विदर्भातून ही यात्रा पुढे जाताना हर्षवर्धन सपकाळ यांनी या यात्रेतील सर्वांच्या योग्य रित्या काळजी घेतली होती. तसेच या यात्रेतील खर्चाचा मोठा भारही उचलला होता असे त्यावेळी त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत होते. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसिद्धीच्या झोतापसून नेहमीच दूर राहिले आहेत.

तर काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदी विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील घोषणाही यावेळी काँग्रेसने केली.

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

युवावस्थेपासूनच गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (nsui) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केलेली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित सातत्याने आयोजन, ही त्यांची वैचारिक प्रतिबध्दता दर्शविते. तसेच ही एक फार मोठी उपलब्धी समजली जाते. शेतीस्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील तथा कटीबध्द आहेत. १९९९ से २००२ या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती, हे येथे विशेष उल्लेखनीय. तसेच २०१४ ते २०१९ या कालावधीत ते बुलढाणा विधान सभा मतदार संघात विधान सभा सदस्य म्हणून राहिले आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन म्हणून कार्यरत आहेत. तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव, अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी सुध्दा पार पाडलेली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.

काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाब चे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. अ.भा.काँ.कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधान सभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत.

एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने १९९६ मध्ये जपान या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी २० भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केलेले आहे.

परिचयपत्र
हर्षवर्धन सपकाळ
(सर्वोदयी कार्यकर्ता)
जन्मः ३१ ऑगष्ट १९६८
जाति – मानव
धर्मः मानवता
राष्ट्रीयत्व : भारतीय
शैक्षणिक योग्यता : बी.कॉम, बी.पी. एड.
व्यवसाय: शेती , सामाजकारण
निवास:”वर्षा” सपकाळ व्हॅली, निसर्ग नगर, जांभरुण, बुलढाणा.(महाराष्ट्र) 443001
संपर्क: ९४२२१८०४८५
परिवार: सौ.मृणालिनी (पत्नी)
डॉ. गार्गी (पुत्री), यशोवर्धन (पुत्र)
सामाजिक क्षेत्रातील योगदान :
1) गांधी तथा विनोबा यांच्या विचारधारेवर आधारीत ग्राम-स्वराज निर्माण
2) सर्वोदय विचारांवर आधारीत राष्ट्रनिर्माण युवक शिबिरे
3) ग्रामस्वच्छता अभियान तथा आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय योगदान
4)जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्पांची अंमलबजावणी.
5)आदिवासी समुदायाचे तथा गावांचे सक्षमीकरण.

राजकीय क्षेत्रातील योगदान:
1) विद्यामान राष्ट्रीय अध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संगठन
2) जेष्ठ पक्ष निरिक्षक – ओडिसा लोकसभा/विधानसभा २०२४
3) राष्ट्रीय सचिव- अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली- सह प्रभारी गुजरात- मध्यप्रदेश -पंजाब (दहा वर्ष)
4) राष्ट्रीय उपाध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संगठन
5) माजी अध्यक्ष- जिल्हा परिषद बुलढाणा (१९९९ ते २००२)
6) माजी विधान सभा सदस्य- २२ बुलडाणा विधानसभा (२०१४ ते २०१९)
7) माजी सदस्य- जिल्हा परिषद बुलढाणा (१९९७ से २००६)
8) शिबिर समन्वयक- गांधी विचार दर्शन सेवाग्राम (अ.भा.काँ.कमिटी द्वारा आयोजन)
9) पक्ष निरिक्षक- अनेक राज्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने.
10)माजी उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *