Breaking News

कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचंय: गावं कोरोनामुक्त करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा नवा नारा

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्यात आलेली दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्याचे सारे श्रेय तुम्हा जनतेचे आहे. तिसरी लाट कधी येईल कोणत्या तारखेला येईल याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचं असल्याचा नारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला.

तसेच प्रत्येक गावच्या संरपंचाने कोरोनामुक्त गावासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन करत शासन प्रत्येकाला सहकार्य करेल असे सांगत कोरोनामुक्त गावं ठेवणारे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आणि दक्षिण सोलापूरातील त्या तरूण सरपंचाशी आपण लवकरच संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते.

हिवरे बाजार सारखा प्रयत्न राज्यातील काही सरपंच व गावे करीत आहेत. मी त्यांचेही कौतुक करतो. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख, कोमल ताई यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण घालून देत आहेत. मी त्यांच्याशी बोलतो आहे. आज कोविडला रोखण्यात जसे वैद्यकीय उपचारांचे महत्व आहे तसेच लोकांची जागृती आणि सहभागही फार महत्वाचा आहे. सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरे बाजार सारखे शिस्तबद्ध रीतीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही कोविडशून्य गाव करता येऊ शकेलं

आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे असे आवाहन मी करतो. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

१२ वी सारख्या परिक्षांसाठी राष्ट्रीय धोरण हवे

१० वी परिक्षेबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यांच्या शैक्षणिकतेत कोणत्याही अडथळा होवू नये यासाठी त्याचे मुल्यांकन करून त्यानुसार त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्याचधर्तीवर १२ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही आपण निर्णय घेणार असून सध्या त्याचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. शिक्षण ही महत्वाची गोष्टी आहे. त्यामुळे त्यावर राष्ट्रीय धोरण असणे आवश्यक आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवश्यकतेनुसार पत्र लिहिन, संवाद साधणे किंवा प्रत्यक्ष भेटायचे असेल तर त्या गोष्टी करेन. १२ वीच्या परिक्षेनंतरच विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग, मेडिकल सारख्या करिअरकडे जाता येते. त्यासाठी विद्यार्थी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा परदेशातही शिक्षणासाठी जातात. त्यामुळे महाराष्ट्राने जरी एखादा निर्णय घेतला तरी तसाच निर्णय इतर राज्यांनीही घेतलेला असा असावा. तरच विद्यार्थ्यांचे शिक्षण निर्धोकपणे पार पडेल. अन्यथा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यादृष्टीने राष्ट्रीय पातळीवर शिक्षणाबाबतच एकच धोरण असावे अशी मागणी त्यांनी पंतप्रधानाकडे केली.

१५ जूनपर्यंत निर्बंध राहणार

ब्रेक द चेन अंतर्गत सध्या लागू असलेले निर्बंध १५ जून पर्यंत लागू राहणार आहेत. मात्र लॉकडाऊन लागू राहणार नाही. काही जिल्ह्यांमध्ये अद्याप कोरोना रूग्ण हलकेसे वाढत आहेत. त्यामुळे निर्बंधात शिथिलता लगेच देता येणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंधात शिथिलता आणण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील पॉझिटीव्हीटी दर पाहून त्या त्या भागात  शिथिलता देण्याबाबत किंवा निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींवर मुख्यमंत्री ठाकरेंचे एक पाऊल पुढे

पहिल्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना म्हणाले होते की, आपल्याला कोरोनासोबत जगायचे आहे. त्यामुळे त्रिसुत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले. मात्र आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकताना म्हणाले की, महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा देतो. त्यामुळे आता दिशा दाखविण्याची वेळ आलेली असल्याने आपल्याला कोरोनासोबत नव्हे तर कोरोनावर मात करून जगायचे आहे. त्यामुळे आपलं कुटुंब, आपला परिसर, आपलं गावं, आपला जिल्हा, आपलं राज्य कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे तर महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल आणि मग देश कोरोनामुक्त होईल असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *