Breaking News

चिपळूणकरांनी मांडली व्यथा… वाऱ्यावर सोडणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मात्र लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही-मुख्यमंत्री उध्व ठाकरे यांची स्पष्टोक्ती

चिपळूण (रत्नागिरी): प्रतिनिधी

काल मी महाड येथील तळीये येथील दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली. आज चिपळूणमध्ये पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलोय. उद्या शक्य  झाले तर पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराची पाहणी करायला जाणार आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच सर्वकष नुकसान भरपाई जाहिर करणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट करत नुकसान मग कोणाचेही असो ते दुकानदार-व्यापाऱ्यांचे असो किंवा सर्वसामान्यांचे कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसून सर्वांना नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात येणार असल्याची ग्वाही देत सवंग लोकप्रियतेसाठी काहीतरी घोषणा करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

चिपळूणमध्ये वशिष्ठ नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण चिपळूण शहर पुराच्या पाण्याखाली गेले होते. त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी हवाई मार्गे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चिपळूणच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत आदींसह अनेकजण उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच बाधित झालेल्या बाजारपेठेची पाहणीही केली.

यावेळी काही व्यापाऱ्यांनी आपणच मायबाप आहात आम्हाला जगवा अशी भावनिक विनंती करत पुरामुळे आमचं सगळं गेलं असून आता काहीच उरलं नसल्याची आपबीती मुख्यमंत्री ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे स्पष्ट करत प्रत्येकाला नुकसान भरपाई देणार असल्याची ग्वाही दिली.

दोन चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल. मात्र आता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न औषध कपडेलत्ते व इतर आवश्यक त्या गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत सबंधित जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करणार असल्याचे सांगत काल मी रायगड जिल्ह्यातल्या तळीये गावामध्ये देखील जाऊन आलो, आपत्तीची अंगावर काटा येईल अशी दृश्ये असल्याचे ते म्हणाले.

उद्या मी पश्चिम महाराष्ट्राचाही आढावा घेत आहे, तेथे देखील पुराचे मोठे संकट आहे. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल. मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचना देखील मी प्रशासनाला केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे माझे पंतप्रधान, गृहमंत्री,संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणं झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करताहेत. येथील नागरिकांना पाऊस,पूर, पाणी नवीन नाही. परंतु या वेळेला जे झालं ते अकल्पित होतं आणि पाणी झपाट्याने वाढल्यामुळे त्यांना आपले सामान आणि वस्तूदेखील वाचवता आल्या नाहीत. यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा ३९ दिवसात ३९९ फाईल्स क्लिअर ३९९ फाईल्सचा निपटारा जनहिताच्या निर्णयांना वेग

राज्य सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेला वेग आला असून नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध …

Leave a Reply

Your email address will not be published.