Breaking News

अखेर वीज कंपन्यांना “ती” गोळी लागू पडलीः अतिरिक्त वीज मिळणार वाढत्या तापमानात ग्राहकांना दिलासा

कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या वीज टंचाईमुळे राज्यात लोडशेडींगचे संकट निर्माण झालेले असताना खाजगी वीज कंपन्यांनी महावितरणला वीज पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्याने वीजेचे मोठे संकट उभे ठाकले होते. मात्र करारानुसार वीज उपलब्ध न करून देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि वीज मंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांना देताच आज या सर्व कंपन्याकडून वीजेचा अतिरिक्त पुरवठा करण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती ऊर्जा विभागाने कळविली आहे.
तापमानाच्या वाढत्या पा-यात कोळसा टंचाई व वाढलेल्या मागणीमुळे सुरु झालेले विजेचे भारनियमन कमीत कमी करुन वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांनी महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.
महावितरणला महानिर्मितीकडून साधारणत: ६,८॰॰ मेगावॅट पर्यंत वीज मिळत होती, ती ७,५॰॰ मेगावॅटपर्यंत मिळणार आहे तर अदानी पॉवर कंपनीकडून आज पसून १,७॰॰ मेगावॅट वरून २,२५॰ मेगावॅट वीज पुरवठा उपलब्ध होत असून आज मध्यरात्रीपासून ३,॰११ मेगावॅट पर्यंत वीजेची उपलब्धता होणार आहे.
दरम्यान, विजेच्या उपलब्धततेनुसार मागणी व पुरवठा यातील तूट कमी झाल्यास राज्यातील भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असून उन्हाच्या वाढत्या तापमानातील वीज संकटात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महावितरणकडून राज्यातील २ कोटी ८० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅट अशी अभूतपूर्व मागणी राहीली आहे. परंतु वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून प्रामुख्याने कोळसा टंचाई तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे २,३०० ते २,५०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली होती. परिणामी नाईलाजास्तव राज्यात काही ठिकाणी भारनियमन करावे लागले. त्यातही देशात सर्वत्र कोळसा व वीज टंचाईचे स्वरुप तीव्र असल्याने विजेच्या उपलब्धतेबाबत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती.
राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी विजेची तूट भरून काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे व कोणत्याही परिस्थितीत राज्यात किमान भारनियमन व्हावे यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. विजेच्या तुटीची संभाव्य स्थिती पाहता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आपात्कालिन नियोजन केले व कमीतकमी भारनियमन व्हावे यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याचे अथक प्रयत्न सुरू केले.
या प्रयत्नांमुळे महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीज निर्मिती कंपन्यांनी अतिरिक्त वीज उपलब्धततेची ग्वाही महावितरणला दिली आहे. महावितरणने केलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे ऐन उन्हाच्या तडाख्यात व कोळसा टंचाईमुळे वीज संकट ओढवले असताना राज्यातील नागरिकांना भारनियमनातून मोठा दिलासा मिळणार आहे.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *