Breaking News

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, धारावी रखडली…काय तो एकदा निकाल लावला पाहिजे २९३ वरील चर्चेवर निवेदन करताना केला आरोप

मागील १५ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या धारावी पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले असून धारावीच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्न कर आहे. काही योजना मनात असतात परंतु त्या आपल्या हातात नसतात असे सांगत पैसे देवून केंद्र सरकारने आपल्याला अद्याप जमीन हस्तांतरीत केली नसल्याने हा विकास रखडल्याचा आरोप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला.

विधानसभेत २९३ खालील चर्चेवर निवेदन करताना त्यांनी वरील आरोप केला. विशेष म्हणजे या चर्चेला गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.

महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अर्थसंकल्पाचा भार सोसणाऱ्या मुंबईचे पुढे रुप कसे असणार आहे हे ठरवण्याच्या दृष्टीने माझे सहकारी काम करत आहेत. मुंबईमध्ये अनेक जण येतात त्यांना अन्न आणि वस्त्र मिळतं पण दिवसभर काम केल्यानंतर पाठ टेकण्यासाठी स्वतःचे घर नसते. बाळासाहेब ठाकरेंनी १९९५ साली युतीची सत्ता आली होती तेंव्हा झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काची घरे मिळालीच पाहिजे हा विचार मांडला आणि त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प सुरु झाले. पण त्याची गती कासवाच्या गतीपेक्षाही मंद होती. आपण असं मानतो की आजोबा नारळाचे झाड लावतात आणि त्याचे फळ नातवाला मिळते. पण आता नातवंडांच्या पण पुढे दिवस जात आहेत. फळे लागत आहेत पण मलई कोण खात आहे हा संसोधनाचा विषय आहे. अनेक वर्षे जी लोक ट्रान्झीस्ट कॅम्पमध्ये राहत आहेत त्यांना घरे मिळवून देण्यासाठी ज्या काही योजना आपण आणल्या आहेत त्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.

मुंबईचा एवढे दिवस सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून विचार करण्यात आला. सोन्याची अंडी दिली जात आहेत आणि ती घेऊन जातात पण कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता. मुंबईसाठी ज्यांनी घाम गाळला, रक्त सांडले त्यांचा विचार कोणीच केला नव्हता. तो विचार नुसता कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षात आणणारे हे सरकार आहे याबद्दल मला बाळासाहेंबांचा पुत्र म्हणून अभिमान वाटतो असे सांगत काही योजना करायच्या मनात आहेत पण त्या आपल्या हातात नसल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही कलानगरमध्ये रहायला आलो तेव्हा चौफेर पसलेली खाडी होती. त्यानंतर विकास होऊन ऑफिसेस उभी राहिली आणि वांद्रे कुर्ला संकुल तयार झाले. बीकेसी सर्वात महागड्या जागांपैकी एक आहे आणि त्याच्याबाजूला धारावी आहे. धारावीचा विकास होऊ शकत नाही याचे कारण दुर्दैवाने केंद्राकडून रेल्वेची जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही. केंद्राच्या ज्या जागा मुंबईत आहेत त्यांचा उपयोग कसा केला पाहिजे याचा विचार करुन चालणार नाही. केंद्राकडे पाठपुरावा करुन त्याचा एकदा निकाल लावला पाहिजे. ३०० आमदारांसाठी आपण घरे बांधणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रकल्पाला गती कशी द्यायची याचा आम्ही अनेकदा विचार केला. काही विकासकांकडून लुटमार झाल्याची माहिती मिळाली याची चौकशी केली जाईल. पण ज्यांची घरे अडली आहेत त्यांचा दोष काय? त्यामुळे आपण जी योजना करत आहोत त्यातून या सर्वांना घरे मिळण्यासाठी चालना मिळणार आहे. कारण आपण विचार करुन घोषणा करतो आणि घोषणा केली की काम करतो. त्यामुळे आता घोषणा झाल्याने काम करणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

अरविंद सावंत म्हणाले, खरी शिवसेना कुणाला पाहायचंय, त्यांना ते कळेल… पोलिसांकडून शिवसैनिकांना अटक व सुटका, सदा सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

गणेश विसर्जनाच्या दिवशी शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रभादेवी येथे राडा झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published.