Breaking News

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना दबंग स्टाईलमध्ये उत्तर, “थप्पड…….झापड” बीडीडी चाळकऱ्यांचे घराचे काम वेगाने पूर्ण करण्याची दिली ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी

भाजपाच्या एका नेत्याने नुकतेच प्रसंगी शिवसेनाभवनची तोडफोड करण्याची चिथावणी खोर वक्तव्य केले त्याचाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सतेजजी आपण घराबाबत ‘डबल सिट’ या चित्रपटाचा उल्लेख केलात, पण आपली तर ट्रिपल सिट आहे. हे ट्रिपल सिट सरकार आहे, हे मुद्दामून बोलतो कारण आतापर्यंत टीका अनेकांनी केली आहे. कोणी कौतुक केलं की भीती वाटते. पिक्चरमधला एक डायलॉग आहे ‘थप्पड से डर नही लगता…’ या अशा थपडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्या त्यापेक्षा दामदुपटीने दिलेल्या आहेत आणि यापुढेसुद्धा देऊ. त्यामुळे आम्हाला कोणी थपडा मारण्याची धमकी देऊ नये असा इशारा देत अशी एक झापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही अशा निर्वाणीच्या शब्दांत विरोधकांना सूचक उत्तर दिले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या वक्तव्याने उपस्थित कडाडताच ‘शिवसेना…झिंदाबाद!!!’च्या घोषणा निनादल्या. याचाच उल्लेख करीत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हा शिवसेनेचा आणि शिवसैनिकांमध्ये असलेल्या रक्ताचा गुण आहे. नुसतं बोलल्यानंतर घोषणा आलीच… हा आवाज उठलाच पाहिजे. तो जर आवाज उठणार नसेल तर त्याला काही किंमत नाही.

बीडीडी चाळीच्या पुरर्विकास प्रकल्पाचा शुमारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनेक मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ज्या बीडीडी चाळींत माझे येणे-जाणे होते. कवी, कलाकार, क्रांतिकारक ज्या चाळींनी दिले. त्या बीडीडी चाळींच्या पुनर्वसनाचा शुभारंभ माझ्या हस्ते मुख्यमंत्री म्हणून भूमिपूजनाने होईल, हे स्वप्न मी कधीही पाहिले नव्हते असे सांगत या बीडीडी चाळींचे महाराष्ट्रावर खूप ऋण आहे ते कधीही फिटू शकणार नाही. त्यांचे आम्ही देणे लागतो, तेव्हा या बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या घरांचे स्वप्न वेगाने पूर्ण करणार आणि त्यावेळी अशाच व्यासपीठावर आम्ही सर्व एकत्र असणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. या दिवशी आज या चांगल्या कामाची सुरुवात होत आहे. ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे ठासून सांगणारे लोकमान्य टिळक केवळ हे सांगून गप्प बसले नाहीत तर त्यांनी चळवळ उभी केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे बरोबर आहे, पण त्या स्वराज्यात माझे हक्काचं घर असू नये ही खंत कोणी दूर करायची असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रत्येक सरकार यायचं आम्ही तुम्हाला घरं देऊ असं आश्वासन द्यायचं, तुम्ही त्या स्वप्नात रममाण होऊन मतं देत आलात, पाठिंबा देत आलात. हा क्षण आपल्या आयुष्यात कधी उजाडेल याचा विचार तुम्ही केला नसेल, पण आज हा क्षण तुमच्या आशीर्वादाने उजाडलेला आहे. हे चाळीतलं आयुष्य तुम्ही जगलात, आता तुम्हाला स्वत:च्या हक्काचं घर मिळतं आहे. हे घर मिळाल्यानंतर ही मुंबई मिळवण्यासाठी जे हुतात्म्यांनी जे रक्त सांडलं ते वाया जाऊ देऊ नका. स्वत:च्या हक्काचं घर झाल्यानंतर कोणत्याही भुलथापांना बळी पडून आपले घर विकू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी चाळवासियांना केले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *