Breaking News

महाविकास आघाडीचे नेते राजभवनावर राज्यपाल म्हणाले, “योग्य निर्णय घेईन” राज्यपाल नियुक्त १२ सदस्य नियुक्तीबाबत अद्यापही कोणताही निर्णय नाहीच

मुंबई : प्रतिनिधी

मागील ९ महिन्यापासून राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांना पाठवूनही त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे याप्रश्नी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विनंती करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज राजभवनावर जात राज्यपालांची भेट घेवून विनंती केली. मात्र याप्रश्नी योग्य तो निर्णय घेईन असे आश्वासन महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्यपालांनी दिले.

मी, मुख्यमंत्री महोदय, बाळासाहेब थोरात, आणि राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांना भेटलो. प्रोटोकॉलनुसार राज्यपालांची भेट घेतली जाते. त्यासाठी आम्ही भेटलो. पावसानं राज्यात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि राज्यातील कोरोनाची स्थिती याबाबत चर्चा केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत प्रश्न केला असता, अजित पवार म्हणाले की, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबतचा ठराव हा कॅबिनेटने केला होता. परंतु त्यानंतर पुढची कार्यवाही झालेली नाही. म्हणून याबाबत विनंती करण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो. त्याबद्दल लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल, असे सांगून आम्ही राज्यपालांना कार्यवाही करण्याबाबत विनंती केली.

ज्या १२ जणांच्या नावांची यादी राज्यपालांना पाठवली आहे, त्यावर राज्यपालांचा काही आक्षेप आहे का? यावर अजित पवार म्हणाले की, राज्यपालांनी याविषयी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही. या नियुक्तीचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आम्ही केवळ विनंती केली की, हा प्रश्न लवकर सोडवला तर बरं होईल. यावर राज्यपाल म्हणाले की, ठिक आहे, मी सगळं ऐकून घेतलं आहे, त्यामुळे मी यावर योग्य तो निर्णय घेईन असे राज्यपालांनी सांगितल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना विनंती केली आहे. अपेक्षा आहे की ते लवकर निर्णय घेतील अशी आशा काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. ६ नोव्हेंबर २०२० ला नवाब मलिक, अनिल परब आणि अमित देशमुख यांनी १२ नावे राज्यपाल यांना भेटून सुपूर्त केली होती. तर त्याच्या दोन आठवडे आधी २९ ऑक्टोबर २०२० ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १२ नावे मंजूर करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली होती.

महाविकास आघाडीकडून शिफारस करण्यात आलेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे…

काँग्रेस

१) सचिन सावंत
२) रजनी पाटील
३) मुजफ्फर हुसैन
४) अनिरुद्ध वणगे – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

१) एकनाथ खडसे
२) राजू शेट्टी
३) यशपाल भिंगे – साहित्य
४) आनंद शिंदे – कला

शिवसेना उमेदवार

)उर्मिला मातोंडकर
२) नितीन बानगुडे पाटील
३) विजय करंजकर
४) चंद्रकांत रघुवंशी

Check Also

उध्दव ठाकरेंचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, त्या स्थगितीमुळे १० हजार कोटी वाढले मुंबई मेट्रो मार्गिका-३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

बहुचर्चित कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गासाठी आरे येथे कारशेड उभे करण्याच्या कामास तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published.