Breaking News

केंद्रीय मंत्री गडकरींच्या त्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे उत्तर सिताबर्डी-झिरो माईल फ्रीडम पार्क- कस्तुरचंद पार्क सेक्शन मेट्रो मार्गाचे उद्घाटन

नागपूर : प्रतिनिधी

रस्ते बांधणीच्या कामात शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधीकडून अडथळा आणला जात असल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित याबाबतची नाराजी व्यक्त करत रस्ते विकासाच्या कामांना मंजूरी देताना विचार करावा लागेल असा गर्भित इशारा दिला. त्याच पत्राचा धागा पकडत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नितीनजी तुम्ही बोलता फार प्रेमात, पण पत्र कठोर लिहिता. तुमचं आणि आमचं नातं थोडं वेगळं आहे. तुम्हीही कर्तव्यकठोर आहात, आम्हीही कर्तव्यकठोर आहोत. आपल्याला कल्पना आहे की शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे, ती आपणही घेतली आहे की, जनतेशी कधीही गद्दारी करायची नाही. त्यांचा विश्वासघात करायचा नाही. जनतेच्या कामात अडथळा येऊ द्यायचा नाही, असे उत्तर देत मी तुमच्या पत्राचा हलका-फुलका उल्लेख जरी केला असला, तरी मी तुम्हाला ग्वाही देतो, की कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकासकामांच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही असल्याची ग्वाही देत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच एकमेकाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करू असेही ते म्हणाले

येथील सिताबर्जी-झिरो माईल मेट्रो स्टेशन आणि फ्रिडम पार्क-कस्तुरचंद पार्कचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पत्राला उत्तर दिले.

प्रगती आणि विकास जलदगतीने साधण्यासाठी दळणवळणाच्या साधनांचा विकास करणे अत्यावश्यक त्यामुळेच आपण राज्यात मेट्रोच, महामार्गांचे जाळे विणतो आहोत. बहुतेक ठिकाणी मेट्रोची कामे आपण उन्नत मार्गाने पुढे नेत आहोत. त्या मार्गाखालचा भाग ही प्रकल्पाचा भाग समजून त्याचा विकास करावा, त्याचे सौंदर्यीकरण करता येईल का, नागरिकांसाठी तिथे काही सुविधा उभ्या करता येतील का याचा महामेट्रोने विचार करावा, अशी सूचना करत नागरिकांच्या सुचनाही विचारात घ्याव्यात जलदगतीने विकास कामे करतांना त्यात त्रुटी राहणार नाही याची काळजी घेऊन आपण एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाऊ या असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनेक चांगल्या कामाचे उदघाटन करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असून देशाचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांना या काळातील आठवणी पुढच्या ७५ वर्षानंतरही काढल्या जातील इतके चांगले काम आपण करूया असे आवाहनही त्यांनी केले.

नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. हे देशातील आणि जगातील उत्तम शहर व्हावे यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न असून झिरो माईल स्टेशन हे एक अनोख स्टेशन आहे. २० मजल्याच्या इमारतीत हे स्टेशन आहे. देशात आतापर्यंत असे एक ही स्टेशन नाही. आता इथून पुढे असे स्टेशन उभारण्याची स्पर्धा निर्माण होईल. हरकत नाही. स्पर्धा ही निकोप असावी एवढीच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

हा सर्वाधिक हरित प्रकल्पांपैकी एक असून यात एकूण उर्जेपैकी ६५% गरज सौर उर्जेद्वारे भागवली जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने, झिरो माईल स्थानकाच्या भोवताली ४०,००० चौरस फुट जागेवर फ्रीडम पार्कचे निर्माण झाले आहे  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी या फ्रीडम पार्कचे देखील उदघाटन करण्यात आले.

कार्यक्रमास  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी (दूरदृष्यप्रणाली)  तर प्रत्यक्ष केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत,  दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  अन्य स्थानिक लोकप्रतिनिधी, नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला, महामेट्रोचे  व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत, केंद्रीय सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 आज हिरवा झेंडा दाखवून सुर करण्यात आलेल्या मेट्रो रेल्वे मार्गाची वैशिष्ट्ये

नागपूर मेट्रोचा हा सर्वात व्यस्त आणि महत्वपूर्ण भाग आहे जो शहरातील ऐतिहासिक वास्तुंना जोडतो.

हा मार्ग सुरु झाल्याने शहरातील वाहतूक सुलभ होत सुमारे १ लाख प्रवासी मेट्रोशी जोडले जातील.

देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने “झिरो माईल फ्रीडम पार्क” ची निर्मिती करण्यात आली आहे.

झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन हे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सर्वात अभिनव अशी रचना आहे. हे देशातील असे पहिले स्थानक आहे जे २० मजली आहे आणि ज्या चौथ्या मजल्यावरून मेट्रो गाड्या धावणार आहेत.

येथे फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब टेक्नॉलॉजी अंमलात आणली आहे ज्यामुळे आवाज आणि कंपन कमी होण्यास मदत होईल.

कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशन हे पारंपरिक भारतीय राजपूत वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे विधानभवनसारख्या सर्वात महत्वाच्या आस्थापनांसाठी हे स्टेशन प्रवेशद्वार आहे. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय संग्रहालय देखील या स्टेशनच्या जवळ आहे.

Check Also

पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता सानुग्रह अनुदान सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू

इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना …

Leave a Reply

Your email address will not be published.