Breaking News

शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य, समर्थनार्थ मोठा मेळावा होणार विरोधी पक्षननेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

राज्यातील देवस्थानांना जोडणारे रस्ते आधीच चांगल्या आणि सुस्थितीत असताना पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. हा मार्गमार्ग १२ जिल्ह्यातून जाणार असून या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्ग मोठ्या प्रमाणावर रेटला जात आहे. आजच्या मोर्चात फक्त कोल्हापूरचे शेतकरी आले आहेत. मात्र भविष्यकाळात यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकत्र येतील असा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत उपस्थित करत शेतकऱ्यांवर शक्तीपीठ महामार्ग लादू नका अशी मागणी केली.

आझाद मैदानावर काँग्रेसचे विधान परिषद आमदार सतेज बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचा मोर्चा राज्य सरकारच्या विरोधात काढण्यात आला. या मोर्चात कोल्हापूरातील अनेक शेतकरी सहभागी होते. या मोर्चाला शिवसेना उबाठाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सतेज बंटी पाटील यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर विधान परिषदेत त्यासंदर्भातील मुद्दाही उपस्थित केला.

हा मुद्दा अंबादास दानवे यांनी उपस्थित केल्यानंतर सभागृहात उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वी समृद्धी महामार्गाच्या उभारणीच्या कामावेळीही शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. तसेच सरकार आपली शेतजमिन घेते म्हटल्यावर त्याचे पैसे देईल का नाही, ती रक्कम पुरेशी असणार आहे की नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले होते. मात्र आज स्थिती बदलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांना चांगला मोबदला दिला असल्याचेही यावेळी सांगितले.

त्यावर काँग्रेसचे आमदार सतेज बंटी पाटील म्हणाले की, आजच्या मोर्चासाठी फक्त कोल्हापूरचेच शेतकरी आले आहेत. मात्र पुढे १२ जिल्ह्यातील शेतकरी यासंदर्भातील मोर्चात सहभागी होतील. राज्य सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादू नका अशी मागणीही यावेळी केली.

त्यावर पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही जेव्हा कोल्हापूरला गेलो, तेथील कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही पुन्हा कोल्हापूरच्या विमानतळावर पोहोचलो. तेव्हा आपले हसन मुश्रीफ यांच्यासोबत शेकडो शेतकरी शक्तीपीठ महामार्गासाठी आमची जमिन घ्या म्हणून अर्ज घेऊन विमानतळावर उपस्थित होते. आम्ही शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादणार नाही तर त्यांच्या सहकार्याने पूर्ण करणार असल्याचे सांगत भविष्यात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोठा महामेळावा होणार असल्याचेही यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *