Breaking News

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कॉम्पेक्स प्रदर्शन महत्वाचे राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे

परिवर्तन हा जीवनाचा नियम असून तंत्रज्ञान क्षेत्रात हा बदल झपाट्याने होत आहे. कॉम्पेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भासाठी माहिती तंत्रज्ञान, डिजीटल गॅझेट, गेमिंग कॉम्पुटींग, कृत्रीम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठे दालन उपलब्ध झाले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भाला पुढे घेवून जाण्यासाठी हे आयोजन महत्वाचे ठरत असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपुरातील भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्थेमध्ये (आयआयटी) उभारण्यात आलेले सेंटर ऑफ एक्सलन्स लवकरच एआय मधील महत्वाचे केंद्र ठरेल, राज्यात विविध क्षेत्रातील संशोधनासाठी इनोव्हेशन सिटी तयार करण्यात येत असल्याचे सांगत सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला शाळेच्या मैदानावर आयोजित ‘तंत्रज्ञान कॉम्पेक्स-२०२५’ प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विदर्भ कंम्प्युटर मीडिया डिलर वेलफेयर असोसीएशनचे अध्यक्ष दिनेश नायडू, सचिव ललित गांधी, उपाध्यक्ष रोहीत जयस्वाल, कोषाध्यक्ष जयंतीभाई पटेल, सहसचिव संजय चौरसीया, माजी अध्यक्ष प्रशांत उगेमुगे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. यात तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी असून या क्षेत्राविषयी जनतेमध्ये जागरूकता होणे गरजेचे आहे. गेल्या ३० वर्षांपासून कॉम्पेक्स प्रदर्शनाचे नागपुरात सातत्याने होणारे आयोजन हे विदर्भातील आयटी क्षेत्र, डिजीटल गॅझेट, गेमींग, क्लाउड कॉम्प्युटींग आदी क्षेत्राच्या वृद्धीसाठी महत्वाचे ठरत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होत आहे. तरूणांचा अशा आयोजनात सहभाग वाढत आहे. नागपूरसह विदर्भ या आयोजनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक पाउल पुढे जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता बदल घडवत आहे. याचा स्वीकार करणे गरजेचे असून राज्य शासनाने गुगल सोबत सामंजस्य करार करून नागपूर आयआयटीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय सुरू केले आहे. येत्या काळात हे देशातील महत्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या बदलामुळे संशोधनातही काम करण्याची आवश्यकता लक्षात घेता राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे. देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून तंत्रज्ञान क्षेत्राची यात महत्वाची भूमिका राहिली आहे. सर्वाधिक युनिकॉनही राज्यातच आहेत. मुंबई ही देशाची अर्थ व तंत्रज्ञान राजधानी ठरत आहे, असेही यावेळी सांगितले.

विदर्भ कंम्प्युटर मीडिया डिलर वेलफेयर असोसीएशनचे अध्यक्ष दिनेश नायडू यांनी प्रस्ताविक केले तर सचिव ललित गांधी यांनी आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनाच्या विविध स्टॉल्सला भेट देवून पाहणी केली. या प्रदर्शनात एकूण ६० स्टॉल्सच्या माध्यमातून संगणक, क्लाऊड सोल्युशन्स, सायबर सुरक्षेसह अन्य क्षेत्रातील नवकल्पना प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. ग्राफिक्स सोल्युशन्स, सीसीटीव्ही आणि क्लाउड तंत्रज्ञानातील प्रगत उत्पादने व सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता ट्रेंड, तंत्रज्ञानातील करियर व संधी आणि आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार आधी विषय येथे प्रकर्षाने दिसून येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *