विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुतीतील मुख्यमंत्री पदावरून महायुतीतील घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात नाराजी नाट्य सुरु झाले आहे. त्यातच काल रात्री नवी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीचे नाव अंतिम करण्यात न आल्याने काळजीवाहू मुख्मयंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे सांगण्यात येत असून नवी दिल्लीतील बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीहून थेट व्हाया मुंबई सातारा जिल्ह्यातील दरे या गावी गेल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अमित शाह यांच्या घरी बैठक झाल्यानंतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्रितरित्या मुंबईच्या दिशेने निघाले. तर एकनाथ शिंदे हे एकटेच मुंबईत आले. तसेच या तिन्ही नेत्यांची खाते वाटपासंदर्भात एक बैठक होणार होती. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीसाठी न थांबताच सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी पोहोचले. त्यामुळे आज होणारी खाते वाटपाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
त्यानंतर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाल्यानंतर शिंदे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दरेला जाण्याच्या आणि नाराजी नाट्याविषयी सविस्तर माहिती दिली.
उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, नाराजीच्या चर्चा सुत्रांच्या हवाल्याने होत आहेत. आज सकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होतो. ते उद्या मुंबईत परतणार आहेत. हल्ली बैठका वैयक्तिक हजर राहुनच होते असे नाही. मोबाईलवरून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनही होते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे चर्चेला उपस्थित राहून चर्चा करणार आहेत. मंत्रिमंडळ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
संजय शिरसाट यांनी भाजपाकडे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले गृह खातेच एकनाथ शिंदे यांना देण्याची मागणी केली असल्याबाबत विचारले असता उदय सामंत म्हणाले की, संजय शिरसाट काय म्हणाले आहेत, हे मला माहित नाही. मी त्यांच्याशी बोलेन आणि त्यानंतर सांगेन असेही स्पष्ट केले.