मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना झाला, परंतु या महिनाभरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातच देशमुख यांच्या सगळ्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. तसेच त्या मोर्चांमधील आक्रमक भाषणांवरून आणि महायुतीतील नेत्यांवर करण्यात येत अलेल्या आरोपांवरून महायुतीतील नाराजी वाढत असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याबद्दल भाष्य केले. नागपूरमधील भाजपाच्या सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील वक्तव्य केले.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोर्चे काढण्याचा अधिकार सर्वांना आहे, बीड प्रकरणी सरकार आणि पोलिस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहे. या प्रकरणात काहीही झाले तरी कोणाला वाचविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आरोपीला वाचू देणार नाही. जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, तसेच जे दादागिरी करून हप्ते गोळा करतात त्यांच्यावर जरब बसविण्याचेही आम्ही ठरविले असल्याचे यावेळी सांगितले.
मुख्मयंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकाविण्यात येत असलेल्या तक्रारीबाबत त्यांची जी काही तक्रार असेल ती त्यांनी पोलिसांकडे द्यावी पोलिस नक्की कारवाई करतील असे ही स्पष्ट केले.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांबद्दल फरार होण्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मारकेऱ्यांनी गुजरातमधील एका मंदिराच्या आश्रामात आश्रय घेतल्याची माहिती पुढे आली असली किंवा आरोपी कुठेही गेले असते त्यांना कुणीही मदत केली असेल तरी आम्ही कारवाई करत आहोत, आम्ही मदत करणाऱ्यांनाही सोडत नाही, या प्रकरणाची नीट चौकशी होऊ द्यावी असे सांगत पण या प्रकरणाचा राजकारणासाठी उपयोग होऊ नये, ही गंभीर बाब असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.