मागील अनेक वर्षापासून राज्यातील एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कितीही नफ्यात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला तरी एसटी महामंडळ काही केल्या फायद्यात येताना दिसत नाही. त्यातच एसटी महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची पैसे पीएफच्या कार्यालयात जमाच केले नसल्याची बाब उघडकीस आली. त्यावरून माजी परिवहन मंत्री शिवसेना उबाठाचे अनिल परब, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फैलावर घेतले. त्यामुळे अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅच्युइटीचे २,२१४.४७ कोटी रूपये अद्याप देण्यात आले नसल्याचे यावेळी मान्य केले.
विधान परिषदेत भाजपा आमदार श्रीकांत भारतीय, काँग्रेसचे आमदार सुधाकर आडबोले यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि भाजपाचे प्रविण दरेकर, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित करत या चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की, कामगारांच्या पैशावर जो डल्ला मारतो, त्यावर सु मोटो गुन्हा दाखल होतो. मी मंत्री असताना पडळकर, सदाभाऊ खोत आणि गुणरत्न सदावर्ते हे वेतनातील पीएफचे पैसे कापले असतील तर ते भरले की नाही हे सारखे बघायचे, जर भरायला उशीर झाला तर त्याची तक्रार दाखल करायचे. या गुन्ह्यात कोणतीही अँण्टीसिपेटरी बेल नाही थेट तुरूंगवासाची शिक्षा आहे. पण मागील सहा महिन्यापासून त्यांची दातखीळ बसली आहे.
अनिल परब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मध्यंतरी एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला. तरी देखील आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली. दुसऱ्याबाजूला पीएफ (भविष्य निर्वाह निधी) संदर्भात आमच्याकडे एकही तक्रार आली नाही. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च केली जाणार नाही असे सांगितले.
त्यावर अनिल परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे असे कुठेही वापरता येत नाही. हा फौजदारी गुन्हा आहे. ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे इतरत्र व पगारासाठी वापरले असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा अशी मागणी करत कर्मचाऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करण्याची मागणीही यावेळी केली.
अनिल परब यांच्या या मागणीवर पुन्हा प्रताप सरनाईक म्हणाले की, महामंडळाची ६४ कोटी रूपयांची मासिक तूट आहे. तसेच शासनाकडून ५८२ कोटी रूपये येणे बाकी आहे, मानव विकास योजनेंतर्गत २६८ रूपये येण्याचे बाकी आहे. त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मी सर्वांना आश्वस्त करतो की, कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजाच्या रकमेचं कोणतंही नुकसान झालेले नाही. त्यांचे व्याज जमा केले जात आहे. कोणाचही नुकसान होणार नाही, एकाही कर्मचाऱ्यांचा पीएफची रक्कम इतरत्र कुठेही खर्च झालेला नसल्याचा दावा केला.
त्यावर अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारला जातोय. या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच या कटात मंत्री म्हणून प्रताप सरनाईक सहभागी आहे का? असा सवालही यावेळी केला.
त्यावर प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ निधीचाएकही रूपया खर्च केला जाणार नाही. काही स्थितीत किंवा वेगळ्या वातावरणानुसार राज्य शासनाच्या निधी अभावी काही गोष्टी घडत असतात. मात्र पीएफच्या निधीसंदर्भात एकही तक्रार आलेली नाही. पैसे कामगारांच्या खात्यावर गेले आहेत आणि व्याजही जमा केलेले असल्याचे सांगितले.