Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्याने संभ्रम, शिवसेनेत आहे की नाही? जळगांवच्या सभेत बोलताना शिवसेनेत असताना असा शब्द प्रयोग केल्याने संभ्रम

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित वेगळी चूल मांडणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांनाही सोबत नेले. बंडाचे निशाण फडकाविल्यापासून एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांकडून शिवसेना आमचीच खरी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आज एकनाथ शिंदे यांनीच जळगांव येथील जाहिर सभेत बोलताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत बोलताना “शिवसेनेत असताना” कसे पाय खेचले जात होते? याचा किस्सा सांगत शिवसेना सोडल्याचे अप्रत्यक्ष जाहिर करून टाकले.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील शासकिय विश्रामगहाचे लोकार्पण केल्यानंतर झालेल्या जाहिर सभेत बोलताना बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार कोसळून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. पण शिवसेना पक्षात अंतर्गत बंड करण्यापूर्वी आपण तब्बल पाच वेळा चर्चा केली. महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात जेवढं काम केलं नाही, तेवढं काम आम्ही अवघ्या अडीच महिन्यात केलं. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्हाला मोठं यश मिळालं.

काल ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा सगळ्यात आघाडीवर आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात सगळ्यांना फक्त घरात बसवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी त्यांना त्यांच्या कामाची पोहोच पावती दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेमुळं आम्हाला यश मिळालं आहे. पण ही तर केवळ झांकी आहे, पिक्चर अजून बाकी आहे.

गेल्या अडीच महिन्यात केलेल्या कामामुळे जनतेनं आमच्या बाजुने कौल दिला आहे. शिवसेनेनं २०१९ मध्ये असंगाशी संग केला होता. अजूनही आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहिलो असतो, तर बोटावर मोजायलाही शिवसेना शिल्लक राहिली नसती. यावरून गुलाबराव पाटील मला म्हणाले होते, आपण सर्वजण एकत्र येऊन २०१९ ची चूक दुरुस्त करू… मी त्यांना म्हणालो, माझं पाच वेळा बोलून झालं आहे. आपण झोपलेल्या माणसाला जागं करू शकतो. झोपेचं सोंग घेणाऱ्यांना माणसाला कसं जागं करायचं? असा प्रसंग एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे.

आम्ही शिवसेना-भाजपा युती म्हणून निवडणूक लढवली होती. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकलो होतो. शरद पवार आणि सोनिया गांधींचे फोटो लावून निवडून आलो नव्हतो. आम्ही जर हे पाऊल उचललं नसतं तर काय परिस्थिती झाली असती, हे सर्वांना माहीत आहे. महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात जेवढी कामं केली नाहीत, तेवढी कामं आम्ही अडीच महिन्यात केली आहेत, आणखी दोन वर्षे बाकी आहेत. आता ते घाबरले आहेत. हा एकनाथ शिंदे सगळीकडे फिरतोय, त्यामुळे तेही फिरायला लागले आहे, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांना यावेळी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावातील एका कार्यक्रमातून जोरदार टोलेबाजी केली आहे. दसरा मेळाव्यावरून त्यांनी उध्दव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. “शिवसेना पक्षात असताना” पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाय कसे ओढले जात होते, याचा खुलासाही त्यांनी केला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना शिवाजी पार्कवरून भाषण करण्यास बंदी घातली होती, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

यावेळी गुलाबराव पाटलांच्या भाषण कौशल्याचं कौतुक करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, गुलाबराव पाटील हे आपल्या शिवसेनेची बुलंद तोफ आहे. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी नेहमी उत्सुक असतो. त्यामुळेच मी त्यांना ठाणे, पालघर अशा सर्वच जिल्ह्यात निवडणुकीसाठी बोलवत असतो. त्यांना बोलवल्यानंतर तेही लगेच येतात. ते जेव्हा शिवाजी पार्कवर भाषण करायचे, तेव्हा ते कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करायचे. माझ्यापेक्षा त्यांचं भाषण चांगलं होईल, त्यांनाच क्रेडिट मिळेल, म्हणून काहींनी गुलाबराव पाटलांचं शिवाजी पार्कवरील भाषण बंद केलं होतं, असा गौप्यस्फोटही त्यांनी करत उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

एकनाथ शिंदे हा कद्रू मनाचा नाहीये. एकनाथ शिंदे हा कार्यकर्त्यांना मोठा करणारा कार्यकर्ता आहे. गुलाबराव पाटील चांगलं भाषण करतात हा त्यांचा गुन्हा आहे का? मग त्यांच्या भाषणावर का बंदी घातली? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.

गुलाबराव पाटलांना उद्देशून एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “शिवसेनेत असताना” गुलाबाला काटे टोचण्याचं काम कुणी केलं? गुलाबरावाचे पाय ओढण्याचे काम कुणी केलं? हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मंत्रीपद देतानाही काय-काय करावं लागलं? याचा साक्षीदार मी स्वत: आहे. महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात जेवढं काम केलं नाही, तेवढं काम आम्ही अवघ्या अडीच महिन्यात केलं. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्हाला मोठं यश मिळालं, असेही ते म्हणाले.

Check Also

वंचितकडून चुकीच्या पाणीपट्टी देयकांची होळी

वाईट शक्तींना जाळून होळीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशाच चुकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *