Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांना त्रास होणार कारण…. शिदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा त्रास होणार

उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. पण त्यांचे पत्र आम्हाला मिळाले. ते सात-आठ पानाचे आहे. ते पत्र बघताना मला वाटले तो अंतिम आठवडा प्रस्ताव आहे अशी कोपरखळी लगावत. त्यांनी लक्षात घ्यावं की आम्हाला सत्तेवर येवून दिडच महिना झाला आहे. परंतु आम्ही थांबलेलो नाही निर्णय घेत असून याचा त्रास अजित पवार यांना होणार कारण यापूर्वी ते सरकार चालवित होते असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला.

राज्य सरकारने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

अजित पवार यांनी आमच्यावर टीका करताना म्हणाले आम्ही लोकशाहीचा मुडदा पाडून आलेले सरकार आहे. विश्वासघाताने आलेले सरकार आहे. मी ऐकले ते सगळे. पण हे सगळं खरे तर अडीच वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होते. कारण आम्ही निवडणूकीच्या पूर्वी युती करून निवडणूकीला सामोरे गेलो होतो. त्यावेळी दोघांनी मिळून एकत्ररित्या जनतेला मते मागितली होती. त्यामुळे जे अडिच वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होते. ते आता केले. त्यामुळे हे सरकार विश्वासघाताचे नाही तर सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या सरकारच्या काळात एनडीआरएफच्या निकषानुसार मदत दिली. मात्र आम्ही एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत शेतकऱ्यांना जाहीर केली आहे. त्यांच्या काळात हेक्टरी १० हजार रूपये दिली. तर आम्ही ती १३ हजार ६०० इतकी हेक्टरी मदत दिली. तसेच हेक्टर मर्यादा २ वरून ती तीन हेक्टर केली. याशिवाय बागायती शेतीसाठी २६ हजार रूपये तर ज्यांचे तीन हेक्टर बागायत शेती आहे त्यांना ३६ हजार रूपयांची नुकसान भरपाई देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात दुष्काळाची परिस्थिती नाही. सर्वत्र पाऊस आहे. ही चांगली चिन्हे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

विरोधकांनी सतत सरकारवर टीका करण्यापेक्षा काही सूचना असतील तर त्या जरूर कराव्यात असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

ऐन पुर परिस्थितीत मी आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही गडचिरोलीतील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी पायलटने हेलिकॉप्टर उडू शकत नसल्याचे सांगितले. पण आम्ही बाय रोड गडचिरोलीला गेलो. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला गेलो. पाहणी केली. मात्र आम्ही दौरा मध्येच सोडून आलो नाही. विरोधकही गेले पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मात्र ते पूर ओसरल्यावर गेले असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

पूर्वीच्या सरकारच्या सरसकट निर्णयाला आम्ही स्थगिती दिली नाही. तसेच जी महत्वाची कामे आहेत त्यांना स्थगिती देण्यात आलेली नाही. फक्त आधीचे सरकार अल्पमतात आल्यानंतर जे शेवटच्या दोन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले त्याचे पुर्नविलोकन करण्यात येत आहे. त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतरही काही निर्णय घेण्यात आले त्याचे पुर्नविलोकन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *