Breaking News

टेंभी नाक्यावरील दही हंडीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हंडी कठीण होती पण आम्ही फोडली… हे थर आणखी वाढणार काळजी करायचे काम नाही

गेल्या दीड ते दोन महिन्यात खूप घडामोडी घडल्या असून त्या दरम्यान आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली. हंडी कठीण होती. पण, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आम्ही हंडी फोडली, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केले. या हंडीसाठी ५० थर लावले होते आणि येत्या काळात या थरांमध्ये आणखी वाढ होईल, असे सूचक विधानही त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ठाकरे गटातून आणखी कोण बाहेर पडणार, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. याची काळजी करायचं काहीही कारण नाही असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली.

टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मानाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावले असून त्याचा मला अभिमान आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच, यावेळचा गोविंदा जोरात आहे ना? अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. दहीहंडी आणि नवरात्रोउत्सवाच्या माध्यमातून आनंद दिघे यांनी आपली संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचे काम केले असून तेच काम आजही सुरू आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, हे दिघे यांचे स्वप्न होते. त्यांची बहीण अरुणाताई यांनी ही बाब मला बोलून दाखवली होती. दिघे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी मुख्यमंत्री म्हणून इथे उपस्थित राहलो, हे माझे भाग्य समजतो, असेही ते म्हणाले.

गोविंदाना सुट्टी आणि विमा पण दिला. आमदार प्रताप सरनाईक आणि इतर लोक प्रतिनिधींनी दहीहंडीला खेळाच्या दर्जाची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली असून त्याचबरोबर सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळाले आहे. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा स्पर्धा होईल, असेही त्यांनी सांगितले.

हे सर्वसामान्याचे सरकार आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे उत्सव काळजी घेऊन साजरे करा. गणेशोत्सव देखील मोठया उत्सवात साजरे झाले पाहिजे, दोन वर्षे थांबलो. हा सण सर्वात मोठा सण आहे. आता या सणांबरोबरच सर्वधर्मियांचे सण ही निर्बंध मुक्त साजरे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रभर फोफावला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेंभी नाक्याला सलामी देऊन पुढे जातो. हा आपला इतिहास आणि परंपरा आहे. ही परंपरा वाढवण्याचं आणि जोपासण्याचं काम आपलं आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पुण्याईमुळे आणि आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री म्हणून या दहीहंडीला उपस्थित राहता आलं, हे मी माझं भाग्य समजतो असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *