Breaking News

छगन भुजबळ यांची मागणी, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

अवकाळी पावसामुळे येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत माजीमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिले आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, देवळा, नाशिक तालुक्यासह जिल्हाभरात विविध ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. शेतातील गहू, कांदे, द्राक्षे, तूर, मका, कपाशी,हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला असल्याचे म्हटले आहे.

पुढे आपल्या पत्रात छगन भुजबळ म्हणाले की, अगोदर झालेल्या अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या बळीराजाला अवकळीने पुन्हा अडचणीत आणले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने व वातावरणीय बदलांमुळे ऐन हिवाळ्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. तसेच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परिणामी, उन्हाळी कांद्याच्या रोपांना व रब्बी पिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा ओला झाला आहे तर काढणीला आलेला कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या अवकाळी पावसामुळे गव्हाचे पिक जमिनीवर आडवे झाले आहे. गव्हाच्या ओंब्यांमध्ये बी तयार होत असतांना पिक आडवे पडल्याने शेकडो हेक्टरवरील गहू हाताशी येणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतात उध्वस्त झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवावा अशी सुचना छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *