Breaking News

त्या चर्चेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, पाटील काय चीज आहे माहित नाही ४२ वर्षे झाली राजकारणात थोडी नाहीत

पुणे: प्रतिनिधी

मागील काही महिन्यांपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर गेले की त्यांची गच्छंती अटळ असल्याच्या चर्चेला सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर आज दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषेदेला सामोरे जाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, त्या सूत्रांच हिंमत असेल तर नाव सांगा, त्यांना माहित नाही की पाटील काय चीज आहे असे सांगत त्यांच्या विरोधात सुरु झालेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

भाजपा नेते अमित शाह यांच्या भेटीसाठी नुकतेच चंद्रकांत पाटील हे गेले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि शाह यांच्यात जवळपास ३ तास चर्चा झाली. त्यानंतर त्या बैठकीला राज्यातील भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित राहीले. या तिघांमध्ये आतापर्यतची सर्वाधिक मोठी चर्चा झाली. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अशाच स्वरूपाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य दोन नेत्यांना सोबत घेवून दिल्ली दौरा केला. परंतु त्यावेळी अमित शाह यांच्याशी भेट होवू शकली नाही. त्यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे यांच्यासह काही राज्यातून केंद्रीय मंत्रिमंडळ‌ात समावेश झालेल्या नेत्यांच्या भेटी घेतल्या.

तुम्ही दिल्लीला गेलात की लगेच सूत्र अपप्रचार सुरू करतात, असं माध्यम प्रतिनिधींनी म्हटल्यावर यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “ते सूत्र मला शोधून दिलं तर तुम्हाला जेवायला देतो.” यावर, तुमच्याच पक्षातील आहेत सूत्र, तुम्ही दिल्लीला जायचं नाव घेतलं की इकडे चर्चा सुरू होते, असं प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी सांगितल्यानंतर हे बघा आमच्या पक्षातील आहे की बाहेरच्या पक्षातील आहेत माहिती नाही, त्यांना हे माहीत नाही की पाटील काय चीज आहे. घाबरणार नाही असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

तर, या अगोदर माध्यमांनी जेव्हा चंद्रकांत पाटील यांना तुमच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती समोर येत आहे, असं सांगितलं. तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्हाला दिल्लीवाले भेटले? सूत्रांची माहिती असेल तर ते सूत्र एकदा प्रकट करा ना. मला या विषयावर काही बोलायचं नाही. कारण, तुमचं मत काय आहे यावर मी काम करत नाही. माझ्या श्रेष्ठींचं माझ्याबद्दल काय मत आहे, आणि त्या मतामध्ये त्यांनी काही म्हटलं तर मग काय करायचं? त्याला मी समर्थ आहे. ४२ वर्षे आहेत, काही कमी वर्षे आहेत का? असा उलट प्रती सवाल करत प्रसार माध्यमांनाच गप्प करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *