Breaking News

पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना दिल्या अनोख्या शैलीत शुभेच्छा अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार का? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

पुणे: प्रतिनिधी

कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी महाविकास आघाडी सरकारला केला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना योग्य काळजी घेऊन व्यवहार करण्याची परवानगी सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी गुरुवारी केली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्या देताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसाला सूख देण्यासाठी व त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना आगामी काळातही महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशा शुभेच्छा द्यायला ते विसरले नाहीत. तर राजकारणातील परखड माणूस अशा शब्दात गौरव करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधांतून सवलत द्यावी, असे सांगितल्याचे एका पत्रकाराने निदर्शनाला आणून प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, अजितदादा पवार आणि राजेश टोपे यांच्याप्रमाणेच आपले मत आहे. आपण ते आधीपासूनच व्यक्त केले आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे असे नियम पाळून काम सुरू केले पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी व्यवहार खुले करावेत. जनजीवन बंद ठेऊन चालणार नाही, परिस्थितीला सामोरे जावे लागेलच. अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का ?

नेत्यांच्या वाढदिवसाला बेकायदा होर्डिंग्ज लाऊन नेत्यांना अडचणीत आणू नका आणि आचारसंहिता पाळा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्या कार्यकर्त्यांवरील कारवाईचे त्यांनी समर्थन केले.

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे ढगफुटी होऊन गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथे तातडीने मदत पाठवून जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. राज्याच्या अन्य काही भागातील पूरस्थितीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने सहकाराविषयी जो निकाल दिला आहे तो तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्या केंद्र सरकारने केलेल्या घटनादुरुस्तीबाबत आहे. या निकालामुळे मोदी सरकारला धक्का बसला असे म्हणणे चुकीचे आहे. मोदी सरकारने निर्माण केलेल्या नव्या सहकार मंत्रालयाचा आणि या घटनादुरुस्तीचा काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याशी आपली ओबीसींना राजकीय आरक्षण कसे मिळेल याविषयी चर्चा झाली. तसेच पक्षाच्या बूथ रचना अभियानाविषयी विचारविनिमय झाला, अशी माहिती त्यांनी दिली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *